लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९ एप्रिल ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून १३ मे ला मतदान होईल. दरम्यान जळगाव आणि रावेर मतदार संघातील भाजप शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांचा मतदारसंघातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर भर दिसून येतोय. कोणत्याही पक्षाच्या वतीने अद्याप कोणत्याही नेत्यांची जाहीर प्रचार सभा झालेली नाही. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखा सुद्धा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक पक्षाच्या वतीने आपले शक्ती प्रदर्शन करतील आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला रंग येईल. अद्याप भाजप शिवसेना अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या स्टार प्रचारकांची जाहीर प्रचार सभांच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या नाहीत. दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार असल्याची संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. तथापि खुद्द भाजप उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांनी हा संभ्रम दूर केला असून, उमेदवारी बदलाच्या अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने ही संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे. जळगाव शहरात घरोघरी स्मिता वाघ यांची प्रचार पत्रके पोचविली गेली असल्याने आता उमेदवारी बदलणे शक्य नाही, हे स्पष्ट होते. तरीसुद्धा महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून अद्याप त्या संदर्भात स्पष्टीकरण होत नाही त्याचे कारण काय? असा मतदारांना संभ्रम पडणे शक्य आहे. अधून मधून बातम्या येतात की, माजी खासदार ए.टी. नाना पाटील हे अद्याप उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीत तळ ठोकून बसलेले आहेत. एकदाचा स्पष्ट खुलासा होऊन त्यावर पडदा पडला पाहिजे. तरीसुद्धा स्मिता वाघ यांचा घरोघरी प्रचार सुरू आहे. महिलांच्या बैठका घेऊन आपला प्रचार सुरू ठेवला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार करण पवार हे सुद्धा घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

रावेर मतदार संघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा सुद्धा मतदारांच्या गाठीभेटींवर सध्या भर असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार उद्योजक श्रीराम पाटील यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केले आहे. तथापि भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना वाटते की, श्रीराम पाटलांची उमेदवारी रद्द करून मला पक्षातर्फे उमेदवारी जाईल. संतोष चौधरी समर्थकांच्या झालेल्या मेळाव्यात चौधरींनी हे वक्तव्य केले. त्यामुळे एक प्रकारे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तसेच संतोष चौधरी म्हणतात, “मला जर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर आपण रावेर लोकसभेची निवडणूक लढणारच आहोत.” त्यांना चार पक्षांकडून उमेदवारी देण्याबरोबरच अध्यक्षपद सुद्धा देण्याची ऑफर आली असल्याचे जाहीर केले आहे. येत्या २४ एप्रिल रोजी संतोष चौधरी रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले आहे. पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे ए बी फॉर्म देण्याचे अधिकार संतोष चौधरींना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एकंदरीत रावेर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. वंचित आघाडीचा उमेदवार ही रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र २५ एप्रिल नंतरच स्पष्ट होईल. दरम्यान प्रचारात भाजपच्या रक्षा खडसे मतदार संघातील गाठीभेटीचा जोर वाढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराचा जोर येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.