भावासह मित्रांना मेसेज व लोकेशन पाठवत तरुणाने केली आत्महत्या…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

साकळी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने दि.१४ रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. मात्र आपल्या नोकरी ठिकाणी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासापायी सदर तरुणाने हे पाऊल उचलेले असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये चर्चिली जात आहे.

साकळी ता.यावल येथील हनुमान पेठ भागातील रहिवासी असलेला निखिल रविंद्र परिस्कर (कुंभार) (३२) हा टपाल (पोस्ट) विभागात नोकरीला होता. गेल्या तीन ते चार वर्षापासून निखिलला आपल्या नोकरीच्या ठिकाणी वरच्या पदावर बढती मिळालेली होती. किनगाव पासून ते चोपडा तालुक्यातील आठ ते दहा खेड्यांमधील टपाल कार्यालयात व्हीजीट अधिकारी म्हणून त्याला तपासणीला जावे लागत असे. दरम्यान काही काळापासून निखिल मानसिक तणावामध्ये होता असे समजते. नोकरी ठिकाणी कुण्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा त्याला खूप मानसिक त्रास आहे, असे त्याच्या मित्र परिवाराने सांगितले. निखिलनेही या अधिकाऱ्याच्या त्रासाबाबत आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. वडील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून यातून लवकरच मार्ग काढणार होते, असे समजते. मात्र त्या अगोदरच निखिलने जगाचा अखेरचा निरोप घेतला.

दि.१४ रोजी निखिल हा नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघाला कार्यालयीन कामाने तो चोपड्याकडे गेला होता. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास अंदाजे ५.३० ते ६ वाजता निखिल याने चोपडा-हातेड रस्त्यावरील काजीपुर गावाजवळी पुलाखाली दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. सदर घटनेच्या अगोदर नैराश्याच्या भावनेने निखिलने आपल्या काही मित्रांना फोनने लोकेशन टाकून व फोन करून ‘मी आत्महत्या करीत आहे, आता मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही असे सांगितले. असे सांगितल्यावर अगदी तात्काळ मित्रांनीही त्याची शोधाशोध सुरु केली. मात्र निखिलचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याने त्याची मोटारसायकल घटनास्थळी पुलावर लावलेली होती.

दि.१५ रोजी त्याच्या मृतदेहावर अतिशय शोकाकुल वातावरणात साकळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेच्या वेळी कुटुंबाचा हृदय पिळून सोडणारा आक्रोश होता. सदर घटनेने साकळीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.