आमदार चंद्रकांत पाटलांचा महायुती सरकारला इशारा..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ मार्च रोजी घोषित होणार असून निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसला ४ जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. परवा भाजप तर्फे महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित झाली. दोन्ही मतदारसंघात भाजपने महिलांना उमेदवारी दिली. जळगाव मधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापून त्या जागी स्मिता वाघ यांना देण्यात आली. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा पत्ता कापण्यात येऊन तेथे दुसरा उमेदवार देण्यात येणार अशी गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून चर्चा चालू होती. पण तसे झाले नाही. खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली. खासदार रक्षा खडसेंनी रावेर लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित होताच मुक्ताईनगर मतदारसंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे गोठात अस्वस्थता पसरली. आमदार चंद्रकांत पाटलांनी शिंदे सरकारच्या महायुतीला पाठिंबा दिला असला, तरी खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीनंतर त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन माझा महायुतीला पाठिंबा असला, तरी मुक्ताईनगर तालुक्यातील राजकारण पाहून योग्य वेळी महायुती माझा पाठिंबा केव्हाही काढून घेऊ शकते. ते म्हणतात मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझ्यावर कोणाचे बंधन असण्याचे कारण नाही. रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे परिवार स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करते आहे. केवळ रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसेंची उमेदवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे एकनाथ खडसे जे उमेदवार देतील तो उमेदवार राहणार राहिला तर रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मिली जुली राहील. म्हणजे उमेदवार एक आणि पक्ष अनेक अशा पद्धतीचे स्वार्थी राजकारण होत असेल, तर वेळ पाहून आपला स्वतंत्र निर्णय घेण्यास मी तयार आहे. अशा प्रकारे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटलांनी केले आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार शिंदे गटाचे असले तरी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यास जे राजकारण केले आहे, त्यालाच आमदार चंद्रकांत पाटलांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांचे राजकारणातील कट्टर शत्रू असलेले एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा त्यांनी घणाघात केला आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणतात, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जसा प्रचार असेल तो पाहून आपण सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करू, असा थेट इशारा दिला आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर किंवा महायुतीला दिलेल्या इशारावर ते कितपत ठाम राहू शकतात याबद्दल शाशंकता म्हणावी लागेल. कारण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात येऊन विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत घातल्यावर आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांची भूमिका बदलतील असा सर्वांचा कायास आहे. परंतु आज तरी आमदार चंद्रकांत पाटील खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून दंड थोपटून मैदानात उतरले आहेत..

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी यंदा खासदार रक्षा खडसेंच्या जागी भाजप तर्फे दुसरा उमेदवार असल्याच्या अपेक्षा फोल ठरल्याने खुद्द भाजपमधील एक निष्ठावान गट नाराज झालेला आहे. माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांची २०१४ च्या रावेर लोकसभेसाठी भाजप तर्फे अधिकृत उमेदवारी घोषित झाली असताना त्यावेळी ऐनवेळी कै. हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून ते तिकीट रक्षा खडसांना दिले गेले आणि त्यामध्ये आमदार एकनाथ खडसे यांच्या महत्त्वाचा रोल होता, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यावेळी गिरीश महाजन यांनी कै. हरिभाऊ जावळे यांची समजूत घालण्यात मोलाचा वाटा उचलला होता. म्हणून त्यावेळी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन रक्षा खडसे ऐवजी कै. हरिभाऊंचे सुपुत्र जिल्हा भाजपचे अध्यक्ष अमोल जावळे यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. परंतु अमोल जावळे यांना तिकीट न मिळाल्याने भाजपच्या निष्ठावान गटांमध्ये नाराजी पसरली आहे. अर्थात ही त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींकडून दूर केली जाईल. तथापि तो उत्साह त्यांच्यात असायला हवा, तो राहणार नाही एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे एकीकडे पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी तर दुसरीकडे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटलांची नाराजी, खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीमुळे ओढावली आहे असे म्हटल्यास त्यात वावगे नाही. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही अल्बेल आहे असे ठामपणे म्हणता येणार नाही. लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस चालू आहे. स्थानिक भाजप नेतृत्वाने रावेर लोकसभेसाठी सुद्धा ज्या नावाची शिफारस केली होती, ती शिफारस केंद्रीय वरिष्ठ नेतृत्वाने अमान्य केल्याचे कळते. त्यामुळे जळगावसाठी स्थानिकांचे ऐकले गेले, पण रावेरसाठी मात्र केंद्रात नेतृत्वाकडून खासदार रक्षा खडसेंची उमेदवारी दिली. यामागे वरिष्ठ नेतृत्वाचे काही राजकीय समीकरण असून त्यांचे वतीने खासदार रक्षा खडसेंना उमेदवारी देऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यातून त्यांचे राजकीय समीकरण साध्य झाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे रक्षा खडसेंना निवडणूक प्रचारात दक्षता घेण्याची गरज आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांचा इशारा हे ‘अळवावरचे पाणी’ ठरणार आहे आणि भाजप एकनिष्ठ गटाच्या विरोध विरून जाईल, परंतु प्रचारात या दोन्ही बाबी लक्षात घेऊन त्यात समन्वय घडवून आणावा लागेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.