झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शुक्रवार, 2 मार्च रोजी झारखंडमधील दुमका येथे संपूर्ण देशाला लाजवेल एक अशी घटना घडली आहे. आपल्याकडे पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो. पण इथे असे काही घडले, ज्याने आपल्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. दुमका येथील कुंजी गावात एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिच्या पतीला मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे
हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि शनिवारी एफआयआर दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. अन्य चार आरोपींचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत. या गैरकृत्याची शिकार झालेल्या महिलेने स्वतःची आपबिती सांगितली आहे. महिलेने सांगितले की, आधी 2 लोक आले, नंतर फोन करून 5 लोकांना बोलावले. सर्वांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर सर्वांनी पतीचे हात बांधून सुमारे अडीच तास एक एक करून बलात्कार केला.
हे जोडपे बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोहोचले होते.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, ती आणि तिचा पती बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोहोचले होते. रात्र झाली तेव्हा ती पतीसोबत शेतात तंबूत आराम करत असताना ही घटना घडली. महिलेने सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोघेही पती-पत्नी तंबूत असताना बाहेरून आवाज आला. दोन जण फोनवर बोलत असल्याचे पाहिले. आम्हाला वाटले की हे सामान्य आहे. मात्र यानंतर इतर लोकही तेथे आले.
7 जणांनी बलात्कार केला
पीडित महिलेने सांगितले की, काही वेळाने त्या दोघांना फोन केल्यानंतर 5 जण 2 दुचाकीवरून आले. सर्वजण तंबूत शिरले. यावेळी तिघांनी माझ्या पतीला पकडून हात बांधून मारहाण केली. यावेळी चार जणांनी मला तंबूतून बाहेर काढले. त्यांनी मला मारहाण केली आणि एक एक करून माझ्यावर बलात्कार केला. महिलेने सांगितले की, ही घटना संध्याकाळी 7 ते 10 च्या दरम्यान घडली असून सर्व आरोपी दारूच्या नशेत होते.
आरोपींनी लूटही केली
एवढेच नाही तर आरोपीने महिलेवर बलात्कार करून मारहाण केली आणि नंतर तिला लुटले. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुन्हा केल्यानंतर आरोपीने पतीचे स्मार्टवॉच, डायमंड रिंग, पर्स, ब्लूटूथ डिव्हाइस, स्पेन बँकेचे क्रेडिट कार्ड, बांगलादेशी नाणी, 11 हजार भारतीय रुपये आणि 300 अमेरिकन डॉलर्स लुटले.