शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्याचे कुतूहल

0

लोकशाही संपादकीय लेख

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बुधवार दिनांक ५ जुलै रोजी मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे शक्ती प्रदर्शन झाले. राष्ट्रवादीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना बाजूला सारून अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केल्याचा ठराव उपस्थित आमदारांनी केला आणि तो ठराव केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचे जाहीर केले गेले. मुंबईत काल झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवारांच्या बैठकीत सर्वाधिक आमदार उपस्थित होते, तर शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र स्पष्ट झाले. कायदेशीर लढाईत कोणाची सरशी होईल ते होवो, तथापि आता मात्र शरद पवारांचे नेतृत्व महाराष्ट्र पिंजून काढण्यात येणार आहे. सातारा आणि कराडच्या शरद पवारांच्या दौऱ्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ९ जुलै आणि १० जुलै रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर शरद पवार येत आहेत. त्यांची पारोळा, धरणगाव आणि मुक्ताईनगर येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांच्या बंडा नंतर शरद पवारांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व राहिलेले आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेषतः शरद पवार यांच्या वतीने तत्कालीन अपक्ष उमेदवार विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील हे अवघ्या पावणेतीनशे मताधिक्याने विजयी झाले होते. आता शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) प्रचार आणि प्रसारासाठी मुक्ताईनगरला येत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून ते पेरणी करत आहेत. त्यांचे सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे असून त्यांना शरद पवारांचे बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अडचणीत आलेले आहेत. त्यातच पुढचे मुख्यमंत्री आताचे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील असे आतापासूनच बोलले जात असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कोंडी झालेली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मुक्ताईनगरच्या सभेचे फार मोठे आकर्षण निर्माण होणे साहजिक आहे.

शरद पवार ९ आणि १० जुलै रोजी जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची धरणगाव (Dharangaon) येथे सुद्धा जाहीर सभा घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. धरणगाव हा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मतदारसंघ असून त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी मंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे यापूर्वीच राष्ट्रवादी पक्षातर्फे जाहीर केलेले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांच्यात काही दिवसांपूर्वी आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला होता. गुलाबराव देवकरांनी केलेल्या पलटवाराने पालकमंत्री गुलाबराव पाटील निरुत्तर झाले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या प्रचाराची जणू रंगीत तालीमच झालेली दिसून आली. आता धरणगाव या मंत्र्यांच्या मतदारसंघात शरद पवारांची जाहीर सभा रंगणार आहे. भर पावसाळ्यात पाणीपुरवठा मंत्र्यांच्या धरणगाव मध्ये २२ दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत असल्याने धरणगावकर हैराण झाले आहेत. त्यातच शरद पवारांच्या सभेने धरणगावकरांना तसेच गुलाबराव देवकरांना फार मोठे बळ प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांची तिसरी सभा पारोळा येथे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. नुकत्याच झालेल्या पारोळा मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आमदार चिमणराव पाटील पिता-पुत्रांचा माजी आमदार व मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी सुपडा साफ केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पारोळा मार्केट कमिटी निवडणुकीत विजय प्राप्त करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार चिमणराव पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान डॉक्टर सतीश पाटलांनी उभे केले आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आमदार चिमणराव पाटलांचा समावेश होणार असल्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी निर्माण झाली असल्याने राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या दौऱ्याने डॉक्टर सतीश पाटील यांची बाजू आणखी भक्कम होणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यात दौऱ्याविषयी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह जनतेमध्येही फार मोठे कुतूहल निर्माण होणे साहजिक आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.