रावेर लोकसभेसाठी चुरशीची लढाई होणार

0

लोकशाही संपादकीय लेख

लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही महिन्यांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभेच्या जागांवर आतापर्यंत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. या दोन्ही जागा भाजपतर्फे लढविण्यात येतील असा दावा भाजपतर्फे केला असला, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रावेर लोकसभेसाठी जागा मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा जागेसाठी महायुतीतील भाजप व शिंदे यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि भाजपतर्फे रावेर लोकसभेची जागा स्वतःकडेच ठेवली जाईल. कारण विद्यमान खासदार भाजप पक्षाचेच असल्याने भाजपची बाजू स्ट्रॉंग आहे. त्यामुळे भाजपतर्फे जळगाव आणि रावेर लोकसभेच्या जागांवर उमेदवार देतील, परंतु दोन्ही मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली जाईल की नवीन उमेदवार देतील याबाबत पक्षात विचार विनिमय सुरू आहे. हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या शोधात भाजप श्रेष्ठींचे मंथन चालू आहे. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार रक्षा खडसे या २०१४ आणि २०१९ असे दोन वेळा निवडून आलेल्या असल्या तरी २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजप रक्षा खडसेंच्या ऐवजी पर्यायी उमेदवाराच्या शोधात आहे. कारण रक्षा खडसेंचे मतदार संघात कार्य चांगले असले, तरी त्या माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या सून आहेत. रक्षा खडसे या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्ता असल्या तरी सासरे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना रक्षा खडसे यांच्या विजयातांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे खडसे कुटुंबीयांमुळे रक्षा खडसे यांच्या जागी भाजपतर्फे दुसरा उमेदवार देण्याचा विचार केला जात आहे. भाजपतर्फे रावेर लोकसभेचे माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांचे नाव चर्चेत आहे. अमोल जावळे हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांना राजकारणाचा अनुभव कमी असून पहिल्यांदाच ते निवडणूक लढवीत आहेत. त्यासाठीच भाजपकडून अमोल जावळे यांना भाजपचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून संघटनेचा अनुभव अमोल जावळे यांना मिळत आहे. तरीसुद्धा भाजप समोर लोकसभा मतदारसंघासाठी हमखास निवडून येणारा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी भाजपचे संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि जळगाव जिल्ह्यावर त्यांची पकड आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाला पसंती देण्यात येत आहे. गिरीश महाजन यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. तसेच जामनेर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बरेच वर्ष विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. जामनेर तालुक्याचे ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे रावेर लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवार म्हणून गिरीश महाजन यांना पहिली पसंती आहे. परंतु ऐनवेळी काय निर्णय घेतला जातो, यावर सर्व काही अवलंबून आहे. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे २०१९ च्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाने बंपर मते घेऊन विजयी झालेले असले तरी भाजपने केलेल्या सर्वेत खासदार उन्मेष पाटलांच्या विषयी निगेटिव्ह प्रस्ताव असल्याने त्यांच्या जागी दुसरा उमेदवार देण्याच्या तयारीत भाजप आहे. कारण महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी या तोडीचा उमेदवार द्यावा असे भाजपला वाटते…!

रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जोरदार तयारी आहे. त्यात महाविकास आघाडीच्या घटकातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची तयारी आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पैकी कोणाला ही जागा जाते, त्यावर पुढे अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडेही जागा गेली तर त्या पक्षाचे उमेदवार म्हणून खुद्द माजी मंत्री एकनाथ खडसे उमेदवार असतील आणि काँग्रेसकडे ही जागा गेली तर काँग्रेसतर्फे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असतील. जागावाटपात महाविकास आघाडीतर्फे रावेर लोकसभेच्या जागी राष्ट्रवादी अथवा काँग्रेस पक्षापैकी कोणालाही मिळाली तरी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातर्फे संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी लावली जाईल. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघाची २०२४ ची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल यातील मात्र शंका नाही. यामुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार यांचे एकास एक अशी निवडणूक होईल आणि रावेर लोकसभेची निवडणुकीकडे अख्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले असेल. भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचे सध्या विळ्या भोपळ्याचे नाते निर्माण झालेले सर्वश्रुत आहे. त्यामुळे गिरीश महाजनांच्या विरोधात शड्डू ठोकून एकनाथ शिंदे खडसे प्रचारासाठी रान उठवतील. त्यातच २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी लाट होती ती सध्या राहिलेली नाही. तसेच विरोधकांची इंडिया आघाडीच्या माध्यमातून होत असलेली एकजूट २०२४ च्या निवडणुकीत परिणाम करणारी असेल. रावेर लोकसभा मतदारसंघातील एकमेव रावेरची जागा वगळता पाच मतदार संघात भाजप व शिंदे गटाचे आमदार आहेत. तथापि भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकार यांच्या विषयी भाजपचा सर्वे निगेटिव्ह आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी सुप्रीम कोर्टाने कोठे जात प्रमाणपत्र सादर केल्याने रद्द केली आहे. त्यात मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातील आमदार एकनाथ खडसे यांची ताकद चांगली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार भाजपला जड जाण्याची शक्यता आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.