लोकशाही न्यूज नेटवर्क
आजकाल संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे जात आहे. याच संशोधनातून यंत्र मानवाची म्हणजेच रोबोटची निर्मिती केली गेली. या रोबोटचा आता सर्वत्र वापर होताना दिसतो. मात्र आपण चित्रपटांमध्ये पहिलेच असेल की हे रोबोट देखील माणसावर हल्ला करू शकतात. अशा प्रकारच्या घटना आता प्रत्यक्षात घडू लागल्या आहेत. इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीत एका रोबोटने कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.खास म्हणजे ही घडना दोन वर्षांपूर्वीची आहे. कंपनीने आपली बदनामी होऊ नये यासाठी ही घटना आतापर्यंत लपवून ठेवली होती. मात्र याबाबत आता माहिती समोर आली आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना टेक्ससच्या ऑस्टिन येथे असणाऱ्या फॅक्टरीमध्ये झाली होती. 2021 साली एक इंजिनिअर फॅक्टरीमध्ये काम करत असताना एका खराब झालेल्या रोबोटने त्याच्यावर हल्ला केला. हा इंजिनिअर अॅल्युमिनिअम कापणाऱ्या रोबोटना डिसेबल करत होता. जेणेकरुन त्यावर काम करता येईल. यामधील एक रोबोट चुकून डिसेबल होऊ शकला नाही. या रोबोटने इंजिनिअरवर हल्ला करत त्याला उचलून आपटलं, ज्यामुळे त्याचं रक्त वाहू लागलं. यानंतर रोबोटने त्या कर्मचाऱ्याचे हात आणि पाठ पकडून ठेवली होती.
यावेळी शेजारी असणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने इमर्जन्सी स्टॉप बटण दाबल्यामुळे या इंजिनिअरला सोडल्याने हा इंजिनिअर तातडीने बाहेर पळाला, ज्यामुळे सगळीकडे रक्त सांडलं. या घटनेचा रिपोर्ट ट्रेविस काऊंटीचे अधिकारी आणि आरोग्य यंत्रणांना देण्यात आला होता. मात्र, माध्यमांपासून ही बाब लपवण्यात आली होती. या रिपोर्टची एक कॉपी आता समोर आली आहे. टेस्ला कंपनीने मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.