रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली होती. प्रचारालाही सुरुवात झाली होती. परंतु ऐनवेळी स्मिता वाघ यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांच्यावर झालेला अन्याय यावेळी दूर करून त्यांना पक्षाने न्याय दिला आहे. मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी कापणार असा सूर होता. तथापि २०१४, २०१९ आणि आता नंतर २०२४ मध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवून रक्षा खडसेंनी उमेदवारीची हॅट्रिक साधली आहे हे विशेष.

खासदार रक्षा खडसेंचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा रक्षा खडसे सुद्धा सासऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. तथापि खासदार रक्षा खडसेंनी अत्यंत संयमाची भूमिका पार पाडली. त्यांनी भाजप वरील आपली निष्ठा कायम राखली. कसल्याही प्रचाराची वक्तव्ये न करता “मी भाजप सोडणार नाही..!” असे वेळोवेळी जाहीर केले. तरीसुद्धा रक्षा खडसेंच्या वक्तव्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु रक्षा खडसेंच्या संयमीपणाबद्दल आणि भाजपमधील एकनिष्ठेबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आणि त्याचीच पावती म्हणजे तिसऱ्यांदा रावेर लोकसभेची उमेदवारी मिळणे हे होय.

खासदार रक्षा खडसेंना भाजपतर्फे उमेदवारी देऊन एक प्रकारे भाजप श्रेष्ठींनी एकनाथ खडसेंना मोठी चपराक दिली आहे. ‘तुमच्याशिवाय रक्षा खडसे या भाजपचे रावेर मधून उमेदवार असू शकतात. निष्ठा काय असते हे तुमच्या सुनेने दाखवून दिले आहे.’ त्याचेच फळ म्हणजे रावेर मधून तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी होय. आता सुनेविरुद्ध सासऱ्यांनी निवडणूक लढवावी असे आव्हानच जणू भाजपने दिलेले आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंची आता फार मोठी पंचायत भाजपने केली आहे. “तुमच्यात हिम्मत असेल तर सुनेविरुद्ध निवडणूक लढविण्यास तयार व्हा..! निवडणुकीत तुमचे काय पानिपत होते ते बघा..!” असे आव्हानच जणू भाजपने एकनाथ खडसेंना दिले आहे. त्यामुळे आधीच प्रकृतीचे कारण पुढे करून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे सांगत जणू निवडणुकीतून माघार घेण्याचे सुतवाच कालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात नाथाभाऊंनी केले.

कदाचित त्यांना कुणकुण लागली असावी की, सून रक्षा खडसे यांना रावेर मधून भाजपची उमेदवारी निघणार आहे. याबाबत उलट सुलट टीका टिप्पणी होईलच, परंतु रक्षा खडसेंनी पक्षनिष्ठा काय असते, याचा आदर्श घालून दिला आहे, एवढे मात्र निश्चित. रक्षा खडसे यांचे मतदार संघातील कार्य सुद्धा कौतुकास्पद असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन मागचा अन्याय दूर केला असला तरी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून यंदा त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कारण हे देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या दहा उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. तसेच तरुण तडफदार उमेदवार म्हणून उन्मेष पाटलांकडे पाहिले जात होते. २०१४ मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेल्या उन्मेष पाटील यांची चाळीसगाव मतदार संघातील कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. उन्मेश पाटील आणि आताचे चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण हे दोघे मित्र होते. परंतु २०१९ मध्ये लोकसभेसाठी जळगाव मतदार संघातून उन्मेष पाटील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न भोवले. विधानसभेत तसेच लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान करून उन्मेश पाटलांच्या पाठीशी उभे राहणारे मंगेश चव्हाण हे दुखावले गेले. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासाठी २०१९ मध्ये मंगेश चव्हाण यांनी आमदारकीचे तिकीट खेचून आणले आणि विजयी झाले. परंतु या दोन मित्रांमध्ये विदुष्ट निर्माण झाले. ते गेल्या पाच वर्षात दिसून आले. दोघे मित्र एकाच पक्षाचे खासदार आमदार असताना त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.

दरम्यान गेल्या पाच वर्षात आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याचा कायापालट केला. जिल्ह्यातील भाजपचे आमदार म्हणून पक्षश्रेष्ठींकडे विशेषतः ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी बनले. परंतु मंगेश चव्हाण यांना उन्मेष पाटलांचा दुरावा त्यांना नडला आणि खासदारकीचे तिकीट गमावून बसले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  तथापि खासदार उन्मेष पाटील हे एक तरुण अभ्यासू नेते असून त्यांना फार मोठे भविष्य आहे. त्यांनी संयम पाळावा आणि रक्षा खडसेंचा आदर्श घ्यावा, असे त्यांना सुचवावेसे वाटते. स्वतः उन्मेष पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा चालू असताना त्यांनी जे स्टेटमेंट दिले ते कौस्तुकास्पद आहे. “जळगाव लोकसभेचे तिकीट नाही मिळाले तरी पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ते करण्यास मी तयार आहे.” असाच संयम त्यांनी ठेवावा भावी काळ तुमचाच राहील एवढे निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.