राष्ट्रवादीत नवख्या ‘चौघांची’ चक्कर.. भाजपाला कशी देणार टक्कर?

नेत्यांची उमेदवारीला ‘ना’ : काँग्रेसही रावेरसाठी धरतेय्‌ आग्रह

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला सोडला असला तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उमेदवारी घेण्यास तयार नसल्याने नवख्यांना संधी दिली जात आहे. चौघांनी इच्छा प्रगट केली असली तरी भाजपला टक्कर कशी देणार? हाच खरा प्रश्न आहे. याच मतदारसंघात काँग्रेस देखील आग्रह धरत असल्याने महाविकास आघाडीत ‘महाभारत’ होण्याची शक्यता आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून त्याला सुरुंग लावणे विरोधकांना डोईजड जाणार हे त्यांच्या व्यूहरचनेवरुनच दिसून येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मतदारसंघ वाट्याला आला असतांनाही त्यांच्याकडे दमदार उमेदवार नसल्याने त्यांना उमेदवारी नवख्याला देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी उमेदवारी घेण्यास जाहीर नकार दिल्याने श्रेष्ठींसमोर यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे इच्छुक असले तरी त्यांच्या वैद्यकीय कारणास्तव त्यांचे तळ्यात – मळ्यात आहे. त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपाला सोडून राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा असली तरी त्याला वरिष्ठांची पुष्टी नाही.

नवख्यांनी व्यक्त केली इच्छा

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारीला नकार दिल्यानंतर यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, प्राचार्य एस. एस. राणे, रमेश पाटील, शेख शरीफ शेख हसन (ठेकेदार) या नवख्यांनी उमेदवारीसाठी जाहीर इच्छा प्रगट केली आहे. चौघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडले, मात्र प्रचाराची धूरा कोण सांभाळेल हाच खरा प्रश्न आहे. एकनाथराव खडसे यांनी ‘कुणी नाही तर मी’ असे सूचक विधान केल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

रवींद्रभैय्यांची जाहीर माघार

वयोमानाचे कारण पुढे करीत जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांनी उमेदवारीसाठी नकार दिला आहे. गत दोन निवडणुकांमध्ये त्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेत उमेदवारी घेतली होती. मात्र त्यांच्या जाहीर माघारीमुळे राजकीय जाणकारही बुचकाळ्यात पडले आहेत. रवींद्रभैय्यांची माघार कशामुळे हे एक कोडेच आहे.

तिकीट घ्या तिकीट

भाजपाच्या जोरदार तयारीमुळे अन्य पक्षातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आटली आहे. ज्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी रिघ लागायची त्याचा राष्ट्रवादीला आज तिकीट घ्या तिकीट असे म्हणावे लागत आहे. पदाधिकाऱ्यांची संख्याही राष्ट्रवादीत कमी झाल्यामुळे इच्छुकांची संख्या स्वाभाविकपणे आटली आहे.

काँग्रेसचा आग्रह वाढला

परंपरेप्रमाणे हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येत असे. मात्र महाविकास आघाडीच्या वाटाघाटीनुसार हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला असून त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने काँग्रेसने हा मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रह सुरु केला आहे. काँग्रेसकडेही आमदार शिरीष चौधरी हे एकमेव दमदार उमेदवार असल्याने ते आग्रह धरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.