महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू…

0

 

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

बारामतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वीज बिल जास्त का आले? असा जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाकडून महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरुणाने महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला होता. बारामतीच्या मोरगावमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळच्या लातूर शहरातील रहिवाशी असलेल्या रिंकू बनसोडे या विवाहीत होत्या. १० वर्षापूर्वी त्या महावितरणामध्ये सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या १० वर्षांपासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीला लागल्यानंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी आलेल्या एका तरुणाने ३४ वर्षांच्या महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. बारामतीच्या मोरगावमध्ये सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. रिंकू कार्यालयात एकट्याच होत्या. अभिजीत पोटे हा तरूण रिंकूला वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारत होता. यावेळी त्याने रिंकू यांच्यासोबत वाद घातला.

अभिजीत पोटेने यावेळी संतप्त होत रिंकू यांच्यावर कोयत्याने एकापाठोपाठ १६ वार केले. रिंकू यांच्या हात-पाय आणि तोंडावर आरोपीने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या रिंकू यांना तात्काळ मोरगाव येथे प्रथमोपचार करत पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान दुपारी ३ वाजता रिंकू यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेपूर्वी त्या १० दिवसांच्या सुट्टीवर होत्या. सुट्टीवरून त्या आजच कामावर रुजू झाल्या होत्या. रिंकू यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.