महाविकासची स्थिती ‘आंगे नी मांगे दोनी हात संगे’.. !

राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची कमतरता ; पदाधिकारी झाले उदंड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीवरच निवडणुकींचा सामना केला जात असतो; परंतु जिल्ह्यात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांविनाच लोकसभेचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारी आहे. सद्यस्थितीत महाविकासची स्थिती म्हणजे ‘आंगे नी मांगे दोनी हात संगे’ अशी झाली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकची शिवसेना आणि काँग्रेस या पक्षात पदाधिकारीच उदंड झाले असून कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा तयार झाला असून प्रत्येक राजकीय पक्ष आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळामुळेच निवडणुकांमध्ये जनतेच्या दरबारात जाणे सोपे होत असते. मात्र आजच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे कार्यकर्त्यांची भक्कम फळी नसल्याने नेत्यांना डोक्याला हात लावून घेण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील साऱ्याच आमदारांनी पदाधिकाऱ्यांसह शिंदेचे हात बळकट करण्याचा विडा उचलला. त्यात उद्धव ठाकच्या गटात बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते व पदाधिकारी शिल्लक राहिले. तोच कित्ता अजित पवारांनी राष्ट्रवादीत गिरवित बंडाचे निशाण फडकावले आणि मोठ्या साहेबांना सोडून अनेक नेते दादांच्या गटात सहभागी झाले. जिल्ह्यात सुरुवातीपासून काँग्रेस मोडकळीला आलेली आहे. काँग्रेसची स्थिती तर कार्यकर्ते कमी आणि पदाधिकारी जास्त अशी झाली आहे.

शिवसेनेचे झाले होत्याचे नव्हते… 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेले बंड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकसाठी घातक ठरले. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी शिंदेच्या बंडाला हवा देण्याचे काम करीत वाट धरली. आमदारच बंड करतात म्हटल्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कसे मागे राहतील? आमदारांच्या पाठोपाठ जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांसह शाखा प्रमुखांनीही शिंदेंना साथ दिल्याने उबाठा गटाचे मोठे नुकसान झाले. पुन्हा नव्याने पक्ष संघटन उभे करणे हा मुद्दा त्यांच्यासाठी कळीचा ठरला असतांना त्यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदारसंघ लढविण्याची वेळ आली असून ते आता त्यात कसा मार्ग काढतील हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. एकेकाळी उत्तर महाराष्ट्रात दबदबा असलेल्या शिवसेनेचे होत्याचे नव्हते झाले. आजच्या स्थितीत उद्धव ठाकरे गटाकडे आमदारांची फौज नसल्याने आहे त्या कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर किल्ला लढवावा लागणार आहे.

राष्ट्रवादीनेही साधली ‘वेळ’

अजित पवार यांनीही भाजपाला साथ देण्याचा विचार केला आणि राष्ट्रवादीत उभी फुट पाडून सत्तेत सहभागी झाले. तोच धडा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते शरद पवार यांच्यासोबत असले तरी बहुतांश कार्यकर्त्यांची फळी ही अजित पवार गटात सहभागी झालेली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला आल्याने तेथे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे वातावरण सुरुवातीला होते. मात्र आता लोकसभेसाठी सक्षम उमेदवारच मिळत नसल्याने त्यांचीही गोची झालेली आहे. राष्ट्रवादीत प्रत्येक नेता ‘वेळ’ साधण्यावर भर देत असून आपलाच उल्लू साध्य करण्यावर भर देत आहे.

काँग्रेस केवळ नावाला..

जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करीत असतांना त्यांना साततत्याने हादरे बसत आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी साथ सोडत भाजपाचा झेंडा हाती घेतला. माजी जिल्हाध्यक्ष डी. जी. पाटील यांनीही तोच पायंडा पाडला. सध्या काँग्रेसमध्ये बोटावर मोजण्याइतकेच नेते शिल्लक राहिले असून कार्यकर्ते मात्र शोधूनही सापडत नाहीत. मागील काळात पक्षाकडून भाजपाविरोधात एकही आंदोलन झालेले नाही. कार्यकर्तेच नाहीत म्हटल्यावर नेतेही काय करणार?

Leave A Reply

Your email address will not be published.