छोट्या-मोठ्या गोष्टीचा बाऊ करु नका- गिरीश महाजन

कार्यकर्त्यांना मंत्र ;बुथ रचनेवर अधिक काम करावे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

परिवारात वाद-विवाद होत असतात. घरात भांड्याला भांडे लागते म्हणून त्याचा बाऊ करु नका. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश संपादन करावयाचे असून त्या दृष्टीने प्रयत्न करावे असा मंत्र मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले. जिल्हा भाजपा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महामंत्री विजय चौधरी, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उमेदवार स्मिता वाघ, रक्षा खडसे, ॲड. किशोर काळकर, नंदू महाजन, डॉ. राधेश्याम चौधरी, उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बुथ रचनेवर भर देणे महत्त्वाचे आहे. आपण स्वत: उमेदवार आहोत अशा भावनेतून प्रचारात सहभागी होणे आवश्यक आहे. परिवरात भांड्याला भांडे लागत असते, त्याचा बाऊ करु नका, पक्ष संघटनेत आदेशाला महत्त्व असून आदेशाचे पालन करणे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असून प्रत्येकाने भाजपाच्या विजयासाठी सज्ज होणे महत्त्वाचे आहे. बुथ रचनेत ‘मोदींचा नमस्कार’ हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबविण्यात यावा असेही ते म्हणाले. यावेळी आ. राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, डॉ. उल्हास पाटील, स्मिता वाघ, रक्षा खडसे, अमोल जावळे यांनी मनोगत व्यक्त केले.

मी हरिभाऊंचा मुलगा… गद्दारी नाही..

मी हरिभाऊ जावळेंचा मुलगा आहे. गद्दारी ही आपल्या रक्तात नाही. हरिभाऊंचेही तिकीट कापले गेले होते मात्र त्यांनी नाराजी व्यक्त न करता अधिक जोमाने काम केले. गद्दारी, दगाफटका करणे हे आपल्या रक्तात नाही. संघ स्वयंसेवक नेहमी आदेशाचे पालन करतो; मीही तेच करणार असून रक्षाताई खडसे यांना अधिकाधिक मते मिळतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.