महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा! – मंत्री गिरीश महाजन

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जिल्ह्यातील महायुतीच्या दोघा महिला उमेदवारांबद्दल अपशब्द वापणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर देण्याची ही वेळ नसली तरी मतदारांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवावी असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महारॅली काढण्यात आली त्यावेळी महाजन बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, संजय सावकारे, चैनसुख संचेती, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ए.टी. नाना पाटील, ॲड. जयप्रकाश बाविस्कर, ज्ञानेश्वर जळकेकर, उज्ज्वला बेंडाळे, स्मिता वाघ, रक्षा खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमच्या दोघे उमेदवार रक्षाताई आणि स्मिताताई यांच्यावर विरोधक खालच्या पातळीची टीका करीत आहेत. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना आपण काय बडबड करतो हेही कळत नाही, माणसामुळे राजकारण खराब होत असून अशा लोकांना घरचा रस्ता दाखवावा लागणार आहे.  स्मितातार्इंबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात विरोधक मग्न असून त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नसल्याने ते घाबरले आहेत. येणारी निवडणूक ही राष्ट्रनिर्मितीची असून मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करावे असे आवाहनहही त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री, मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, स्मिता वाघ, रक्षा खडसे यांनी मनोगत व्यक्त करुन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.

महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत महारॅली काढण्यात आली. ढोल-ताश्यांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोहचली. यावेळी महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांची पाठ

मुक्तार्इनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने उलट-सुलट चर्चा आहे. सुरुवातीपासूनच चंद्रकांत पाटील यांनी खडसे परिवारावर टीका केली असून त्यांची अनुपस्थिती आज काही तरी वेगळे सांगून गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.