आरोपी बकालेची बडदास्त; पोलिसांवर पुन्हा शिंतोडे…

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

वादग्रस्त निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी बकाले यांना जळगाव ऐवजी धुळे तुरुंगात दाखल करण्यासाठी जळगावहून धुळे येथे पोलीस वाहनाने नेत असताना त्यांची जी बडदास्त जळगाव पोलिसांनी ठेवली तो पुन्हा वादाचा आणि टीकेचा विषय बनला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी करताना बकाले यांना मोबाईल फोनवरून बोलण्याची संधी देण्यात आली, आणि इतर सवलती सुद्धा दिल्या गेल्या. केवळ पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकारी असल्यामुळेच ती सुविधा दिली गेली.

वास्तविक आरोपीला पोलीस कोठडी अथवा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येते, तेव्हा किंबहुना त्याला अटक झाली तेव्हापासून त्याचे जवळील मोबाईल आदी सारख्या वस्तू पोलिसांकडून हस्तगत केल्या जातात. कायद्याने त्याचे जवळ मोबाईल असेल तर पुरावा नष्ट करण्यासाठी सुद्धा त्या मोबाईलचा उपयोग आरोपी करू शकतो. म्हणून त्याचे जवळील संपर्काचे साधन तातडीने जप्त केले जाते. पोलीस खात्यातील कर्मचारी अथवा अधिकारी यांना याची जाणीव नाही असे म्हणता येणार नाही. इतर आरोपींना अशा प्रकारची सवलत देताना याच पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून कायद्याचा बडगा दाखवतात. ‘कायद्याने देता येत नाही’ असे सांगतात. परंतु पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना जी सवलत देण्यात आली, ती केवळ पोलीस खात्याचे एक वरिष्ठ अधिकारी असल्यानेच दिली गेली. त्यामुळे जळगाव पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होतेय याचे भान ही सवलत देताना राहिलेले नाही. परंतु फोटोग्राफरच्या कॅमेरातून ते दृश्य टिपले जाईल, याची भीती सुद्धा बकालेची बडदास्त ठेवणाऱ्या पोलिसांना वाटली नाही हे विशेष.. कायद्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांची जबाबदारी आहे, तेच कायदा कायद्याचे पालन करीत नाहीत. त्यामुळे जनतेत याचा वेगळा संदेश जातो. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांना सर्वसामान्यांना याची भीती वाटत नाही. पोलिसांबाबत जनतेला जो आदरयुक्त धाक अथवा भीती वाटली पाहिजे ती राहत नाही. अशा पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होते.

पोलीस निरीक्षक बकाले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल साडेसोळा महिने ते फरार होते. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने अश्या पद्धतीने तपास अधिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इतके महिने फरार राहणे अशोभनीय आहे. मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एवढे दिवस फरार राहण्याचे कारण काय? केवळ पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याला फरार राहण्यास जळगावच्या पोलिसांनी मदत केली. त्यामुळे जळगावचे पोलीस खाते बदनाम झाले. त्यात भर म्हणून की काय, पुन्हा आरोपी बकालेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करताना जी बडदास्त ठेवली गेली त्यामुळे पुन्हा शिंतोडे उडवले जात आहेत. ज्या पोलिसांनी ही बडदास्त ठेवली त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने योग्य ती कारवाई करून हा डाग पुसून काढावा ही मागणी होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. ते निश्चितपणे बकालेंची बडदास्त ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करतील हीच अपेक्षा…!

Leave A Reply

Your email address will not be published.