यंदा भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सव २५ ते २९ जानेवारी दरम्यान…

आठ मान्यवरांना बहिणाबाई पुरस्कार जाहीर; महोत्सवात १५० महिला बचत गटांचा सहभाग...

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दरवर्षीप्रमाणे भरारी फाउंडेशनच्या वतीने खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा, बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ चे नवव्या वर्षाचे आयोजन दि. २५ ते २९ जानेवारी २०२४ ला बॅ. निकम चौक, सागर पार्क, जळगाव या ठिकाणी करण्यात आले आहे. यंदा बहीणाबाई महोत्सवाचे नववे वर्ष असून यावेळी पाच दिवसाचा हा महोत्सवाचे असणार आहे. बचत गटातील महिलांना हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी व त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी याकरिता गेल्या आठ वर्षापासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन होत आहे.

यावर्षी १५० महिला बचत गटांनी महोत्सवात सहभाग घेतला आहे. या महोत्सवात महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व अस्सल खान्देशी खाद्य पदार्थांचा खाद्य महोत्सव या बहिणाबाई महोत्सवात आयोजित होत आहे. महिला बचत गटा सोबतच जळगाव जिल्ह्यातील लघु उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व प्रसिद्धी करण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाच्या वतीने विशेष स्टॉल लावण्यात येणार आहे.

दि. २२ जानेवारी २०१४ रोजी संपूर्ण भारतभर राममंदिर स्थापना उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून या वर्षी बहिणाबाई महोत्सवाचे मुख्य आकर्षण आयोध्या येथील स्थापन होत असलेल्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती बहिणाबाई महोत्सवाच्या अग्रस्थानी असणार आहे.

बहिणाबाई महोत्सवात दि. २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०१४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने खान्देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक स्थळांची माहिती देणारे खान्देश पर्यटन चित्र प्रदर्शनी व कलादालन या महोत्सवात असणार आहे.

खान्देशची संस्कृती व लोककलेचा उत्सव हे ब्रीद घेऊन नवव्या वर्षात पदार्पण केलेल्या बहिणाबाई महोत्सवातील या वर्षीचा सांस्कृतिक जागर देखील विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे. यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले (जालना) यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम होणार आहे.

आपल्या सुंदर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना भुरळ घालणारा सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे (नाशिक) यांचा भावगीत व लोकगीतांचा कार्यक्रम असणार आहे. जळगावच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य दिग्दर्शिका डॉ अपर्णा भट यांचा रामायणावर आधारित सेतू बांधा रे हि नृत्य व संगित नाटिक तसेच खान्देशा सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला प्रवीण माळी यांचा अहिराणी एकपात्री कार्यक्रम आयत पोयत सख्यान व प्रजासत्ताक दिनी एक शाम देश के नाम हा मराठी हिंदी देशभक्ती गीतांचा विशेष कार्यक्रम या वर्षीच्या महोत्सवात आयोजित करण्यात आलेला आहे.

दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, देशसेवा, कला, साहित्य, लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवातील नवव्या वर्षाचे बहिणाबाई पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात येत आहे.

या वर्षीच्या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक उद्योग, वैद्यकीय, कला साहित्य लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ व्यक्तींन बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या वर्षी सुनील भोकरे चाळीसगाव जि. जळगाव (देशसेवा), डॉ गणेश चंदनशिवे मुंबई (लोककला), डॉ. गिरीश सहस्त्रबुद्धे जळगाव (वैद्यकीय), डॉ. प्रीती अग्रवाल जळगाव (शैक्षणिक), सौ. मनीषा घोलप नाशिक (महिला सक्षमीकरण), सौ. अर्चना जाधव जळगाव (उद्योग व कौशल्य विकास), अनिल कोष्टी भुसावळ जि. जळगाव (नाट्य), नामदेव कोळी जळगाव (साहित्य), यांना या वर्षीचा मानाचा बहिणाबाई पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.