‘दादागिरी’ला ‘शिंदे-शाही’ लावणार चाप..!

देतो तेवढे घ्या, भाजपाचा सल्ला : इकडे ‘आड’ तिकडे ‘विहीर’

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीचा बिगुल कुठल्याही क्षणी फुंकला जाणार अशी स्थिती निर्माण झाली असतांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ‘दादागिरी’ला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरसावले असून मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार यांनी तयार व्हावे असा सल्ला भाजप श्रेष्ठींनी दिल्याचे समजते, आजमितीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था म्हणजे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

राज्यातील 48 जागांपैकी भाजपाला तब्बल 45 जागांवर विजय संपादन करावयाचा असल्याने ते प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलत आहेत, राज्यात महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढविल्या जाणार असून भाजपासोबत शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झालेले आहेत. भाजपाने शिवसेनाला दोन अंकी तर राष्ट्रवादीला एक अंकी जागा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर महायुतीत नाराजीच्या फुलबाज्या फुटण्यास सुरुवात झाली, मात्र आता वेळ कमी असल्याने एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासमोर पर्याय शिल्लक राहिला नाही.

मिळेल ते पदारात पाडून घेण्यातच शहानपण असल्याने शिंदे आणि पवार शक्य तेवढे पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडाचे निशान फडकावून भाजपाला साथ दिल्याने त्यांना सहाजिकच जास्त जागा मिळतील, पाठोपाठ अजित पवार यांनीही सत्तेसाठी ‘कमळा’चा सुंगध घेतल्याने त्यांनाही थोडा वाटा द्यावा अशी भाजपाची भावना असल्याने शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.

एकंदरीत ‘शिंदे-शाही’ अजित पवारांच्या ‘दादागिरी’ला चाप लावण्यात यशस्वी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, महायुतील मतभेद संपण्याच्या वाटेवर असून लवकरच उमेदवारांची घोषणा होणार असून ‘झाले गेले विसरुन’ पुन्हा नव्याने संसार थाटण्यावर महायुतीने भर दिला आहे.

…तर कमळावर लढा !

अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष असला तरी फुटीनंतर त्यांना पाहिजे त्या प्रमाणात सहानुभूती मिळालेली नाही, लोकसभेसाठी वाट्याला येतील त्या जागा निवडून आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हाण असल्याने राष्ट्रवादीचे काही नेते भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हावर लढण्याचा विचार करीत आहेत, भाजपही त्याला ‘होकार’ भरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे,

भाजप इच्छुकांची धक्‌धक्‌ वाढली

महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले असून कुठल्याही क्षणी महाराष्ट्रातील उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची धक्‌धक्‌ वाढली आहे, काही विद्यमान खासदारांना भाजप ‘नारळ’ देण्याच्या तयारीत असून यात कुणाचा पत्ता कट होतो हे पाहणे उत्सुकतेचा विषय झालेला आहे, अनेक इच्छुक दिल्लीच्या भाजप कार्यालयाकडे नजरा लावून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.