शासन आपल्या दारी द्वारे शिवसेना भाजपचे शक्तिप्रदर्शन

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव (Jalgaon) येथे मंगळवार दिनांक 27 रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे उपस्थितीत झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ठोस असे प्रकल्प पदरी पडले नाही. तथापि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना तसेच भाजप (BJP) तर्फे एक प्रकारची शक्ती प्रदर्शन मात्र झाले. गेल्या महिन्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या दारी येत आहे, अशा प्रकारे या अभियानाचा गाजावाजा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा यासाठी वापरण्यात आली. शासन आपल्या दारी जळगावचा कार्यक्रम आतापर्यंत झालेल्या इतर कार्यक्रमांपेक्षा सरस होईल, अशी इच्छा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केली होती. शिंदे फडणवीस सरकारची गतिमान सरकार म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे चौथ्यांदा जळगाव जिल्ह्यातील आले. ते घरात बसून शासन करीत नाहीत अथवा आधीच्या महाविकास आघाडी सरकार प्रमाणे फेसबुक लाईव्ह सरकार नाही तर जनतेचे लाईव्ह सरकार असल्याची टिप्पणी सर्वांनीच आपल्या भाषणात वाजवली असली तरी मुख्यमंत्री शिंदे चौथ्यांदा जळगाव जिल्ह्यात आले असतानाही विकासाचे ठोस प्रकल्प जिल्ह्याला मिळाले काय? तापी नदीवरील दोन पुलाच्या कामांचे उद्घाटन फक्त झाले म्हणजे विकास झाला काय? ज्या पाडळसे धरणामुळे जळगाव आणि धुळ्याचा कायापालट होणार आहे आणि तो प्रकल्प निधी अभावी प्रलंबित पडला आहे. त्या निधी संदर्भात ठोस घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडून झालेली नाही. बोदवड सिंचन प्रकल्प निधी अभावी थंडबस्त्यात पडले आहे. त्याला निधी वाढवून देऊन विहित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची घोषणा मात्र झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कारकिर्दीत गिरीश महाजन (Girish Mahajan) जलसंपदा मंत्री असताना गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्याची घोषणा होऊन त्याला केंद्राची मंजुरीही मिळाली. तथापि प्रत्यक्षाच्या त्याच्या कामाला सुरुवात व्हायला पाहिजे होती, त्या संदर्भात मात्र दोघांनाही ठोस अशी घोषणा केली नाही. हातनुर धरणाचे नवीन दरवाजे बसवण्यासाठी मंजुरी मिळून सात आठ वर्षे झाले, तथापि निधी अभावी त्या दरवाज्याचे काम होत नाही. त्यामुळे धरणातील गाळ वाढत जाऊन धरण साठ्यातील पाण्यावर त्याचा परिणाम होतोय. या हत्नुर धरणाच्या दरवाज्याच्या कामाला गती देण्यासाठी ठोस असे पाऊल उचलले गेले नाही. शेळगाव बॅरेज प्रकल्प पूर्ण झाला असला तरी त्यावर उपसा सिंचन योजना मंजूर योजनांना मंजुरी देऊन त्याद्वारे शेती सिंचन करणे आवश्यक आहे. तथापि त्याबद्दल दोघांनीही काहीही घोषणा केली नाही. शेळगाव बॅरेज प्रकल्पांतर्गत ज्या गावचे पुनर्वसन व्हायला हवे ते अद्याप झालेले नाही. त्या पुनर्वसनाबाबत शासन आपल्या दारी अभियानांतर्गत कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळणे अपेक्षित होते तथापि तसे आश्वासन मिळाले नाही.

जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ज्वलंत समस्या असताना तसेच त्या संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव वाढवून मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे जवळ व्यक्त केली. तसेच पेरणीचा हंगाम उगवला तरी भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात 60 ते 65 टक्के इतका कापूस विक्री अभावी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे, असे निदर्शनास आणून दिले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे आपल्या भाषणातून दिली. महाराष्ट्र आणि केंद्र यांचा डबल इंजिन मुळे विकासाच्या कामाला गती मिळाली आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून केळी विकास मंडळ स्थापन झाले असले तरी निधी अभावी केळी विकास मंडळाचे काम ठप्प होते. त्या केळी विकास मंडळाला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, ही घोषणा दोघांनीही केली असली तरीही वेळेत हा निधी केव्हा उपलब्ध करून दिला जाईल याचे ठोस आश्वासन मात्र मिळालेले नाही. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी गतिमान कामे होण्यासाठी जळगावला विभागीय महसूल आयुक्त कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी हे कार्यालय केव्हा अस्तित्वात येईल याचे मात्र ठोस आश्वासन मिळाले नाही. सर्वात महत्त्वाचा कापसाच्या भावासंदर्भात प्रश्न सर्वजण मान्य करूनही कापसाचे भाव वाढवून देण्यासाठी दोघांनीही ठोस घोषणा केली नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कायम आहे. एकंदरीत शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत शिंदे फडणवीस सरकारने जिल्ह्यासाठी काही नवीन न देता स्वतःचे शक्तिप्रदर्शन मात्र केले, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटल्या…!

Leave A Reply

Your email address will not be published.