मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. ३९ बंडखोर आमदार आणि मंत्र्यांनी सरकारमधून आपला पाठींबा काढला आहे. यामुळे राजकीय नाट्य रंगले आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड आरोप प्रत्यारोप होत आहेत. गुलाबराव पाटील हे टपरी चालवत होते त्यांना शिवसेनेने मोठे केले. यापूर्वी गुलाबराव पाटलांनी राजकीय फायद्यासाठी बाप बदलणार नाही, असे सांगितले होते. पण आता त्यांनी पक्षांतर केले असे सांगत संजय राऊत यांनी त्यांना पुन्हा टपरीवर बसावे लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला होता.
तसेच संजय राऊत यांनी मला परत टपरीवर पाठवू अशी भाषा वापरली. पण त्यांना चुना कसा लावतात हे माहित नाही. आता मी त्यांना ते दाखवून देईल, असे आव्हान शिवसेना नेते माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी बहुमत चाचणी पूर्वी दिले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर गुवाहाटी येथे असलेल्या शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत आपले ५१ आमदारच शिवसेनेच्या उरलेल्यांना प्रत्युत्तर द्यायला समर्थ आहेत, अशी गर्जना गुलाबराव पाटील यांनी केली.
दरम्यान संजय राऊतांच्या या टीकेला गुवाहाटीतील मुक्कामाच्या अखेरच्या दिवशी गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्या वाटचालीत पक्षाचा वाटा असला तरी आमचीही मेहनत आहे. ही मेहनत संजय राऊत यांना कळणार नाही. आम्ही काय आयत्या बिळावर नागोबा नाहीत. पक्षासाठी केस कशी अंगावर घेतात हे राऊत यांना माहीत नाही, ते मी भोगलेलं आहे. पक्षाच्या कार्यकर्ते आणि जनतेसाठी आम्ही सतत काम करत असतो. सभागृहात उद्या आम्हीच शिवसेनेच्या बाकीच्यांना प्रत्युत्तर द्यायला पुरेसे आहोत, असेही गुलाबराव म्हणाले.