५०० किलो गांजा प्रकरणातील तस्करला एलसीबीच्या पथकाने पकडले !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून ‘सेटलमेंट’ घडवून आणण्याचे सांगत गांजा तस्कर सिबारामला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे .

जळगाव जिल्हा एलसीबीचे पथक गस्तीवर असताना दि.१० फेब्रुवारी रोजी भुसावळजवळ त्यांनी ट्रक क्रमांक एमएच.१५.एएच.६९९४ हा संशयास्पदरित्या उभा असताना जप्त केला होता. एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी खात्री केल्यावर ट्रकमध्ये सुमारे ७५ लाखांचा ५०० किलो गांजा मिळून आला होता. पथकाने शिताफीने ट्रक चालक प्रकाश सुनील कासोटे रा.झोडगे ता.मालेगाव याला अटक केली होती.

एलसीबीच्या पथकाने चालकाला ताब्यात घेतल्यावर झोडगे येथूनच गांजाचा मुख्य पुरवठादार सीबाराम दया बसवाल रा.फासीगुडा, ता.गुंजम, जि.ओरिसा याचा पत्ता लागला . मुख्य म्होरक्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून चालकाच्या मोबाईलवरून त्याला संपर्क साधायला सांगितला. पोलीस सेटलमेंट करायला तयार असून त्यासाठी तात्काळ यावे लागेल असे चालक प्रकाश याने सिबारामला सांगितले. आपली सुटका होईल या हेतूने सीबाराम थेट विमानाने ओरिसाहून मुंबईत पोहचला. येथून तात्काळ रेल्वेने मनमाड गाठले आणि मालेगाव पोहचताच एलसीबीच्या पथकाने सीबारामला ताब्यात घेतले.

ट्रक चालक आणि गांजा तस्कर या दोघांना ताब्यात घेतल्यावर पथकाने ट्रक मालक सतिष लक्ष्मण वाघ रा.आडगाव जि.नाशिक याचा शोध घेत ताब्यात घेतले . गांजा मागविणारा संशयीत मालेगाव येथील असून त्याचे नाव निष्पन्न झाले असून एलसीबीचे एक पथक एका संशयिताच्या शोधार्थ रवाना झाले असून लवकरच त्याला देखील अटक होईल .पोलिसांच्या अटकेत असलेले ट्रक मालक सतिष लक्ष्मण वाघ रा.आडगाव जि.नाशिक, मुख्य पुरवठादार सीबाराम दया बसवाल रा.फासीगुडा, ता.गुंजम, जि.ओरिसा व ट्रक चालक प्रकाश सुनील कासोटे रा.झोडगे ता.मालेगाव या तिघांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता दि.१६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एलसीबीचे उपनिरीक्षक गणेश चोभे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.