या नाथाभाऊ….या !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे अर्थात नाथाभाऊ पुन्हा आपल्या मुळ पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याने भाजपमध्येही ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे वातावरण निर्माण झाले आहे. चैत्र शुद्ध पाडव्याच्या दरम्यान त्यांचा प्रवेश होवू शकतो. चैत्रात ज्या प्रमाणे वृक्षाला नवी पालवी फुटते त्याच प्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांना आनंदाची पालवी फुटली आहे. नाथाभाऊंच्या प्रवेशाने सर्वसामान्य कार्यकर्ता जरी आनंदीत झालेला असला तरी ‘काही’ नेत्यांच्या पोटात ‘गोळा’ उठलेला आहे हे नक्की! गेल्या तीन महिन्यांपासून नाथाभाऊंच्या प्रवेशाच्या बातम्या पेरल्या जात होत्या. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘खडसेंचे संबंध वरिष्ठ नेत्यांकडे आहेत’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती त्यावेळीच या प्रवेशाला हिरवा कंदील असल्याचे समजले जात होते.

राज्यातील कुठलाही निर्णय घेतांना देवेंद्र फडणवीस उत्तर महाराष्ट्रात निर्णय घेतांना गिरीश महाजन यांना विश्वासात घेतले जाते हे स्पष्टच आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात नाथाभाऊंचे योगदान मोठे आहे, ते नरजेआड कधीच करता येणार नाही. त्याकाळात भाजपमध्ये येण्यास कुणीही धजावत नसतांनाही नाथाभाऊंनी मोठी फळी उभी केली होती. काँग्रेसविरुद्ध आक्रमक होत त्यांनी अनेक सभा तर गाजविल्याच शिवाय मोठ-मोठे आंदोलने करुन सरकारला घाम फोडला होता. तेच नाथाभाऊ मध्यंतरी भाजपला सोडून गेले. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे ते शरीराने तिकडे तर मनाने भाजपमध्ये असाच होता. आता तर स्वत: नाथाभाऊंनीच भाजप प्रवेशाला ‘होकार’ दिल्याने सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

नाथाभाऊ म्हणतात मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे असे म्हणता येणार नाही. ते तर मी बांधलेले घर आहे. मी माझ्या घरात परत जात आहे. जाण्याचा दिवस आपण जाहीरपणे कळविणार आहोत, असे सांगत त्यांनी घरवापसीवर भाष्य केले. खडसे हे भाजपत जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याबाबत संकेतही मिळत होते. मात्र आता नाथाभाऊंनीच घरवापसीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने असे होणार तसे होणार या चर्चा थांबल्या आहेत. मध्यंतरी खडसे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती तेव्हाच त्यांची घरवापशी ठरलेली होती; मात्र योग्य मुहूर्त शोधला जात होता.

नाथाभाऊ आणि भाजप हे एक समीकरण आहे, प्रत्येक पक्षात अंतर्गत मतभेद असतात तसे नाथाभाऊंचेही देवेंद्रजी आणि गिरीशभाऊंशी झाले होते. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो हे सांगणे नको! नाथाभाऊंच्या घरवापशीच्या सुरुवातीच्या काळात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. भाजपने या जागेवर रक्षा खडसे यांना तिकीट दिले; त्यामुळे एकनाथराव खडसे यांना तिकीट मिळाल्यास रावेरमध्ये सून विरुद्ध सासरे अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशी चर्चा सुरु असतानाच खडसे यांच्या गोटात मात्र वेगळ्याच हालचाली होत होत्या, तब्येतीचे कारण देत नाथाभाऊंनी उमेदवारी घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. नव्या वर्षाच्या दुसऱ्याच महिन्यात भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरु झाली. यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीच विधान केले होते. खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे गिरीशभाऊ म्हणाले होते. खडसे भाजपत येण्यासाठी जोर लावत आहेत. मात्र त्यांना पक्षात घ्यायचे की नाही, याबाबत मला अजूनतरी कोणी विचारलेले नाही, असे महाजन यांनी स्पष्टपणे सांगितल्याने त्यांच्या घरवापशीला ‘सहज’ घेण्यात आले.

खडसे भाजपत आल्यावर त्यांचे कोणी कसे स्वागत करायचे हे ठरवू, असे महाजन म्हणाले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी देखील वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. या साऱ्या घटना घडत असतांना खुद्द नाथाभाऊंनी हे वृत्त फेटाळले होते. दिल्लीमध्ये गेल्यावर अनेकांशी भेटीगाठी होतात, मात्र मी दिल्लीला गेलेलो असताना यावेळी कोणाचीही भेट झालेली नाही, असे खडसे त्यावेळी म्हणाले होते. भाजपत जायचे असेल तर मला प्रयत्न करण्याची गरज नाही. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत, असे म्हणत भाजप प्रवेशाचे वृत्त त्यांनी सुरुवातीला फेटाळलेे. या घटनेला काही काळ होत नाही तोच भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनीही खडसे दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत, असे विधान केले.

खडसे यांना भाजपत घ्यायचे की नाही हा वरिष्ठांचा निर्णय असेल. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे तेव्हा चव्हाण म्हणाले होते. चव्हाण यांच्या या दाव्याने खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक बळ मिळाले. मध्यंतरीच्या काळात नाथाभाऊ-गिरीशभाऊ आणि मंगेशदादा यांच्यात मोठे शाब्दीक युद्ध रंगले होते; खालच्या पातळीवर जावून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होता. त्यातून काहीही साध्य झाले नाही. झाले तर ते भाजपचेच नुकसान झाले. आता नाथाभाऊ पुन्हा पक्षात येत असल्याने जुन्या गोष्टींना तिलांजली देवून विकासाचे राजकारण सर्वांनाच करावे लागणार आहे. जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी या सर्वांना हातात हात घेवून पुढाकार घ्यावा लागणार आहे. ‘झाले गेले गंगेला मिळाले’ हेच तत्व अवलंबवावे लागणार आहे.

शनिवारी तर नाथाभाऊंनी मी भाजपत जातोय अशी माहिती दिल्याने त्यांचे कार्यकर्ते भर उन्हात सुखावले आहेत. नाथाभाऊ ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना आगामी काळात काय जबाबदारी मिळते हे पक्षनेतृत्वाच्या हातात असले तरी ‘लोकनेत्या’ची ही घरवापशी कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करणारी आहे. या नाथाभाऊ…. या! असेच स्वागत करावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.