सहसंचालकांची चुप्पी रुग्णवाहिका चालकांच्या मुळावर !

ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे प्रयत्न

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबई येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीला राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. रुग्णवाहिका चालकांनी गेल्या दोन आठवड्यापासून याबाबत तक्रार करुनही विभागाचे संचालक डॉ. विजय बाविस्कर यांनी अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याने त्यांची चुप्पी चालकांच्या मुळावर उठली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका चालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या हक्काचे मानधन अद्यापही मिळालेले नाही. या संदर्भात तब्बल 25 चालकांनी सहसंचालकांची प्रत्यक्ष भेट घेवून ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने केवळ कागदीघोडे नाचविले असून कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. ठेकेदाराच्या मनमानीला रुग्णवाहिका चालक पुरते कंटाळले असतांनाही अधिकाऱ्यांनी मक्तेदारावर दाखविलेली दया चालकांच्या मुळावर उठलेली आहे. मुंबई येथील आरोग्य भवन येथील सहसंचालकांच्या अखत्यारीत हा विषय असूनही ते या विषयाला बगल देत आहेत. रुग्णवाहिका चालकांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकले असतांनाही ते कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्यावरील होणारे अत्याचार त्यांची सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांच्याकडे कथन करुनही त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही.

खरेदी कक्षाच्या पत्राला तिलांजली

मुंबई येथील आरोग्य सेवा आयुक्तालय कार्यालयाच्या खरेदी कक्षाने दि. 27 मार्च 2024 रोजी ठेकेदार असलेल्या राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीला चालकांचे मानधन त्वरीत देण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने या पत्राला तिलांजली दिली असतांनाही त्याच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरेदी कक्षाचे सहसंचालक यांनी चालकांना ठोस कारवाईचे आश्वासन दिले होते; मात्र त्यांनाही या आश्वासनाचा विसर पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.