जागतिक आरोग्य दिनानिमित्त महत्व आणि उपाय

0

जळगाव ;- जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने “आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे”. पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, राहणीमान इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे. केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती म्हणजे चांगले आरोग्य असा अर्थ अभिप्रेत नाही. वंश, धर्म, राजकीय श्रद्धा, आर्थिक किंवा सामाजिक स्थिती असा भेद न करता आरोग्याच्या सर्वोच्च प्राप्त दर्जाचा आनंद हा प्रत्येक माणसाच्या मूलभूत अधिकारांपैकी एक आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य मिळणे हा त्यांचा हक्क आहे. केवळ शारीरिक आरोग्य महत्त्वाचे नसून सामाजिक आरोग्य सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे.
सामाजिक, भावनिक आरोग्य म्हणजे आपल्या भावना समजून घेण्याची आणि व्यवस्थापित करण्याची आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी सामाजिक संबंध आणि नातेसंबंध निर्माण करण्याची क्षमता होय. मजबूत सामाजिक, भावनिक आरोग्य एखाद्या व्यक्तीला त्यांचे विचार, भावना आणि वर्तन अशा प्रकारे एकत्रित करण्यास सक्षम करते जे जीवनात अधिक आरोग्य आणि कल्याणास समर्थन देते.
सकारात्मक सामाजिक परस्पर संवादांमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे आहेत, ज्यात वाढलेली संज्ञानात्मक क्षमता, चांगले मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, स्वातंत्र्य आणि सुधारित शारीरिक आरोग्य , विशेषत: वृद्ध लोकांमध्ये असते.

संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य वेळी योग्य काळासाठी झोपणे, व्यसन नसणे आणि तणाव नियंत्रित ठेवणे ही आरोग्याची पंचसूत्रे असतात. आजच्या जीवनशैलीत आरोग्याच्या या सर्वच नियमांना हरताळ फासला आहे. त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे, हीच आरोग्यमय आयुष्याची गुरुकिल्ली ठरते.

सामजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे. सामाजिक प्रश्न किंवा अडचणी सोडवण्याचा आपणहून प्रयत्न करणे असे म्हणता येईल.

सामाजिक आरोग्याची व्याख्या इतरांशी संवाद साधण्याची आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याची आपली क्षमता म्हणून केली जाऊ शकते. सामाजिक परिस्थितींमध्ये आपण किती आरामशीरपणे जुळवून घेऊ शकतो याच्याशीही ते संबंधित आहे. सामाजिक संबंधांचा आपल्या मानसिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर आणि मृत्यूच्या जोखमीवर परिणाम होतो.
एखाद्या व्यक्तीचा इतर लोकांशी संबंध प्रस्थापित करण्याच्या क्षमतेला सामाजिक आरोग्य म्हणतात. सामाजिक आरोग्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन बदलण्याची क्षमता होय.

मानसिक आरोग्यामध्ये आपले भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण समाविष्ट आहे . आपण कसे विचार करतो, अनुभवतो आणि कसे वागतो यावर त्याचा परिणाम होतो. आपण तणाव कसे हाताळतो, इतरांशी कसे संबंध ठेवतो आणि निरोगी निवडी करतो हे निर्धारित करण्यात देखील मदत करते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, बालपणापासून ते तारुण्यापासून ते प्रौढत्वापर्यंत मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते. सामाजिक आणि मानसिक आरोग्यात चिंता आणि नैराश्याचे कमी दर, उच्च आत्मसन्मान, अधिक सहानुभूती आणि अधिक विश्वासार्ह आणि सहकारी संबंध यांचा समावेश होतो.

सामाजिक आरोग्य हे अनुवंशिकता, सभोवतालचे वातावरण व जीवन, जीवन पद्धती, आहार व पोषण, आरोग्य व औषधोपचार सेवा, समाजाची आर्थिक स्थिती, चांगले पर्यावरण, योग्य राहणीमान, शिक्षण, शेती, उद्योगधंदा, ग्रामीण विकास इत्यादीवर अधिक अवलंबून आहे.

कुटुंब किंवा मित्रांकडून प्रोत्साहन नसल्यामुळे, जे एकटे आहेत ते अस्वास्थ्यकर सवयींमध्ये सरकतात,” “याशिवाय, एकाकीपणामुळे तणावाची पातळी वाढते, झोपेत अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे शरीराला हानी पोहोचते. एकाकीपणामुळे नैराश्य किंवा चिंता देखील वाढू शकते .” याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. हा परीणाम आधी मनावर, भावनेवर, नंतर हळूहळू शरीरावर होतो. सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम, पोषण आहार याबरोबरच सामाजिक, मानसिक, भावनिक स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत आपले आरोग्य आपल्या हातात असणे महत्वाचे असले तरी ते आपल्या हातात राहिलेले नाही कारण सभोवतालचे सामाजिक वातावरण, पोषक लोकशाही, सभोवतालचे पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, प्रदुषण मुक्त वातावरण, वाहतूक व्यवस्था हे सामुहिक कार्य आहे. सार्वजनिक व्यवस्थेतील असुविधा यांचाही परीणाम मनावर, कुटुंबावर, समाजावर आणि शेवटी शरीरावर होण्याची शक्यता अधिक असते.

लेखक समाजकार्य क्षेत्रातील शिक्षक असल्याने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मत व्यक्त केलेले आहे. सर्व जण या मताशी सहमत असतील असे नाही.
प्रा. उमेश वाणी
लोकसेवक मधुकरराव चौधरी
समाजकार्य महाविद्यालय जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.