लोकशाही संपादकीय लेख:
जळगाव शहरातील खराब खड्डेयुक्त रस्त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली तर त्यात नवल नाही. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्याच्या बांधकामाला वेग येईल असे सांगण्यात आले. पावसाळ्याचे चार महिने संपले. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून दोन महिन्यांचा कालावधी देखील लोटला. लोकप्रतिनिधींचा होणारा तथाकथित अडथळा दूर झाला. दोन महिन्यांपासून प्रशासकीय रजेवर आहेत. प्रशासकीय कारकीर्दीत विकास कामे गतिमान पद्धतीने होतील ही अपेक्षा होती. तथापि ही अपेक्षा फोल ठरली आहे. या उलट लोकप्रतिनिधींची कारकीर्द चांगली होती, असे म्हणावे लागेल असा प्रशासनाचा कारभार चालला आहे. लोकप्रतिनिधींकडे जाऊन जनतेला आपले गाऱ्हाणे तरी मांडता येत होते. आपल्या प्रभागात पुन्हा निवडून येण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रभागातील विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करीत असत. तथापि आता सत्ता प्रशासकाकडे केंद्रित झाल्यामुळे प्रशासक डॉ. विद्या गायकवाड या जनतेचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. अधिकाऱ्यांची आपापसातील कामाच्या चालढकल करण्याच्या पद्धतीमुळे विकास कामाला तसेच नियमित प्रशासनाच्या व्यापात दिरंगाई होत आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू मामा भोळे यांनी गेल्या वर्षभरापासून घोषणांचा पाऊस पाडला आहे. परंतु एकही घोषणा पूर्ण स्वरूपाला अद्याप आलेली नाही. जळगाव शहराला कोणी वाली आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काम पूर्ण करण्यासाठी दिवाळी सणाचा मुहूर्त देण्यात आला परंतु दिवाळी सुद्धा संपली. परंतु जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांना मुहूर्त काही सापडलेला नाही.
बळी तो कान पिढी या न्यायाने ज्या भागातील जनतेचा रेटा जास्त असतो तेथील कामे होतात. पण वर्षानुवर्षे रस्ते, गटारी नसलेल्या भागात जनता असहाय जीवन जगत आहे. भुसावळ रोडवर असलेल्या खेडी या भागाची अशीच दयनीय अवस्था आहे. पावसाळ्यापूर्वी खेडीच्या पेट्रोल पंपा समोरील डीपी रोड मंजूर झाला होता. पावसाळा झाल्यानंतर त्यांच्या कामाला सुरुवात होईल, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. फक्त टाऊन प्लॅनिंगची मंजुरी हवी; ती मिळाली की रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. परंतु टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी सांगतात, आमचा रिपोर्ट बांधकाम विभागाला केव्हाच देण्यात आला आहे. सर्वस्वी जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. दोन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलो करून कामात दिरंगाई केली जातेय. प्रशासनाचा या अधिकाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे ‘येरे माझ्या मागल्या’ चालू आहे. आमदार राजू मामा भोळे आणि प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांची मत भिन्नता असल्याने कामात दिरंगाई होते आहे. परंतु अनेक प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील वादात जनता मात्र भरडली जातेय…!