भुसावळच्या गुन्हेगारीला वेळीच ठेचून काढा

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

भुसावळ शहर रेल्वेचे जंक्शन म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक विविध राज्यातून रेल्वेत नोकरीच्या निमित्ताने भुसावळ वास्तव्याला आहेत. कॉस्मोपोलिटीअन शहर म्हणून भुसावळची ओळख आहे. संपूर्ण भारतातून प्रवासी रेल्वे भुसावळ मार्गे जातात. प्रत्येक प्रवासी रेल्वे गाडी येथे किमान दहा ते पंधरा मिनिटे थांबते. रेल्वे विभागीय कार्यालय असल्याने येथे रेल्वेच्या स्टाफची अदलाबदल होते. रेल्वेमध्ये लागणारे पाणी येथे घेतले जाते, डब्यांच्या साफसफाई होते, गाडीच्या तांत्रिक बाबींची तपासणी होते. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी रेल्वे स्टेशनवर असतात. अशावेळी रेल्वे प्रवाशांच्या वस्तूंची शिताफिने चोरी करणारे गुन्हेगार आपले वेगळे जग निर्माण करत आहेत. अशातून शहरात सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती आपोआपच वाढीला लागली आहे. त्यामुळे भुसावळ शहराला गुन्हेगारीचे शहर म्हणून काही वर्षांपूर्वी शिक्कामोर्तब झाला होता. गेल्या दहा-बारा वर्षापासून त्यावर पोलिसांनी चांगलेच नियंत्रण आणले होते. तथापि अलीकडे भुसावळची गुन्हेगारी परत डोके वर काढत आहे. गेल्या दोन महिन्यात लागोपाठ खुनाच्या घटना घडत आहेत. आता दसऱ्याच्या दिवशी दिलीप रामलाल जोनवाल या ४९ वर्षीय इसमाचा ज्या पद्धतीने सिनेस्टाईल खून झाला त्याने खळबळ उडाली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या वडिलांचा खून केला, म्हणून वडिलांच्या खुनाचा बदला मयत दस्तगीर खाटीकच्या तीस वर्षीय मुलाने घेतला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. पंचवीस वर्षांपूर्वी दिलीप रामलाल यांनी दस्तगीर खाटीकचा खून केला होता. त्या खुनाच्या आरोपातून दिलीप रामलाल जोनवालची दोन वर्षानंतर कोर्टातून निर्दोष सुटका झाली होती. कोर्टात जरी दिलीपला निर्दोष सोडले असले तरी दस्तगीरच्या खुनाच्या वेळी पाच वर्षाचा त्याचा मुलगा आदिलच्या मनातून मात्र तो निर्दोष सुटलेला नव्हता. आपल्या बापाचा मारेकरी दिलीप जोनवाल हा त्याच्या मनात कायमचा घर करून बसला होता. अखेर पंचवीस वर्षानंतर दिलीप जोनवालचा आदिलने आपल्या नातेवाईकांच्या मार्फत २४ ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेच्या सुमारास खून करून बापाच्या खुनाचा बदला घेतला. दिलीप जोनवालचा खून हा गुन्हेगारीचा अस्सल नमुना म्हटला पाहिजे. याचा अर्थ गुन्हेगारीची पाळेमुळे भुसावळात किती खोलवर रुजलेली आहेत, हेच या घटनेवरून दिसून येते. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

भुसावळ हे गुन्हेगारीचे शहर म्हणून असलेली ओळख पुसून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे. वीस वर्षांपूर्वी जळगावचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या नातेवाईकांचे अजमेरला लग्न होते. त्या लग्नासाठी रेल्वेची स्वतंत्र बोगी करून सुरेश दादा जैन यांचा परिवार चालला होता. रेल्वे भुसावळला थांबली असताना सुरेश दादा यांच्या धर्मपत्नी रत्नाभाभी जैन यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ऐन गाडी सुटण्याच्या वेळी चोरट्यांनी लांबवली होती. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर गाडी थांबवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जात होती. त्यावेळी सुरेश दादांनी जळगावचे तत्कालीन नगरसेवक कै. गफ्फार मलिक आणि माजी उपमहापौर करीम सालार यांना फोन केला. तेव्हा गफ्फार मलिक आणि करीम सालार यांनी सुरेश दादांना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात वेळ घालवू नका, तुम्ही निश्चिंतपणे लग्नासाठी रवाना व्हा, असे सांगितले. आणि सुरेश दादा परिवारासह रवाना होताच काही तासांनी चोरलेली सोन्याची चैन परत मिळाली. सांगायचे तात्पर्य, भुसावळच्या गुन्हेगारीचे हात फार लांब पर्यंत पोहोचलेले आहेत. गुन्हेगारांची जी गॅंग असेल त्याच्या प्रमुखाला सांगून सोन्याची चैन मिळाली. गुन्हेगारी प्रवृत्ती अशाच प्रकारे वाढत जाऊन गुन्हेगारीचा शिक्का भुसावळला लागला आहे. आता सुद्धा भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या वस्तूंच्या चोऱ्या होतात. परंतु प्रवाशांना तेवढा वेळ नसल्याने या घटना दाबल्या जातात. दिलीप रामलाल जोनवाल खून म्हणजे पूर्वनियोजित खुनाचा कट म्हणावा लागेल. भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला वेळीच ठेचून काढणे गरजेचे आहे. अन्यथा गुन्हेगारीची दहशत वाढली तर सर्वसामान्यांना जिने मुश्किल होईल हे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.