डाकू कोण ?

0

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. यापूर्वी बोदवड नगरपंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमामालिनीच्या गालाबरोबर केली होती. दुसरे दिवशी त्यांचेवर चौफेर टीका सुरू झाली तेव्हा माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला म्हणून त्यांनी माफी मागितली. हेमामालिनीच्या गालाशी रस्त्याची तुलना केली तेव्हासुध्दा मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात गेल्या 40 वर्षापासून राज्य करणाऱ्या माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचेवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

आतासुध्दा त्यांनी एकनाथराव खडसे यांचेवर मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पहाणाऱ्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? असे एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली इतकेच नव्हे तर त्यांना ‘डाकू` संबोधले. यावेळी मात्र डाकू या शब्दाचा उपयोग गुलाबरावांनी जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजनसारखे डाकू असतांना त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? असा शब्दप्रयोग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस गोटात खळबळ उडाली. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. दरम्यान एकनाथराव खडसे यांनी गुलाबरावांवर शेलक्या भाषेत बोचरी टीका केली.

नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलतांना एकनाथराव खडसेंनी आपली व्यथा व्यक्त केले. 40 वर्षे भाजपची सेवा केली. राज्यात पक्ष वाढवला. भाजप – सेनेचे सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पहात असतांना माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून बसवला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीस मिळाले. अशा शब्दात एकनाथराव खडसेंकडून व्यथा व्यक्त केली जात होती. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटलांना खडसेंवर घसरण्याचे काही कारण नव्हते. परंतु आगामी काळात मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व पुन्हा होऊ नये आणि हा मतदार संघ शिवसेनेचाच राहावा या उद्देशाने गुलाबरावांनी हे वक्तव्य केले. हे मात्र निर्विवाद सत्य आहे.

प्रत्येक पक्षाने आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करतात अणि ते करण्यात काही गैर नाही. तथापि हे करीत असतांना शब्दप्रयोग जपून केला पाहिजे. परंतु गुलाबराव फर्डे वक्ते आहेत. आपल्या भाषणात श्रोत्यांकडून दाद मिळावी, भाषणाला प्रतिसाद मिळावा. टाळ्या मिळाव्यात म्हणून लोकांना आवडतील अशा शेलक्या शब्दाचा वापर करतात. परंतु एकनाथराव खडसेंनी गुलाबरावांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना त्यांच्या शालजोडीतून खरपूस समाचार घेतला. त्यांनी गुलाबरावांनी निर्व्यसनी अभ्यासू नेते म्हणून टोला हाणला. त्यामुळे गुलाबराव पाटलांनी डाकू म्हणण्यामागचा प्रत्यक्षात हेतू नव्हता. ती बोली भाषा आहे. एकनाथराव आणि गिरीश महाजनांसारखे ‘डाकू` नेते असतांना म्हणून धुरंदर नेते असे म्हणायचे होते. पण माझ्या बोली भाषेचा अर्थ वेगळा काढला असे म्हणून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु बूंदसे गयी वो हौदसे नही आती. त्यामुळे आता कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी डाकू या शब्दप्रयोगाचा फायदा एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांनाच होणार आहे आणि हे आगामी काळात स्पष्ट होईल.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या आधीच्या मंत्र्यांनी जिल्ह्यासाठी काहीच केले नाही म्हणून एका दगडात दोन पक्षी म्हणजे एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचेवर प्रहार केला आहे. याचा अर्थ एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजनांनी जिल्ह्यासाठी काहीच केले नाही. जे काही करायचे ते आता मला लागत आहे किंवा मला करावे लागणार आहे असेच गुलाबरावांना सूचित करायचे आहे का? म्हणजे जिल्ह्यातील विकास कामे झाली नाहीत त्याचे खापर आधीच्या नेत्यावर फोडल्यास आपल्यावरील टीका कमी होऊ शकते असे गुलाबरावांना वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. फडणवीस सरकारात राज्यमंत्री असतांना माझ्या हातात चिडी मारायची बंदू दिलीय आणि वाघाची शिकार करण्याची माझ्याकडून अपेक्षा केली जातेय असे वक्तव्य करून राज्यमंत्र्यांना काहीच अधिकार नसतात त्यामुळे कामे होत नाहीत अशी स्वत:ची भलावण केली होती.

आता सुमारे सव्वा दोन वर्षोपासून कॅबीनेट मंत्री असतांना मागच्या नेत्यावर टीका करायची हे योग्य नव्हे. स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षात काँग्रेसची सत्ता असतांना काँग्रेसने काहीच केले नाही अशी टीका भाजप व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीकास्त्र सोडतात. तसेच गुलाबरावांचे वक्तव्य नाही का? एकंदरीत मागे काय झाले, काय झाले नाही यांचे पठण करीत बसण्यापेक्षा आपण आतापर्यंत काय केले आणि यापुढे काय करणार आहोत हे जिल्ह्यातील जनतेला सांगितले पाहिजे. त्यामुळे उगाच डाकू वगैरे शब्दप्रयोग करून नामुष्की ओढवून घेऊ नये. कारण एक बोट जेव्हा दुसऱ्याकडे करतो तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे डाकू हा शब्दप्रयोग आपल्यावरही होऊ शकतो याचे भान असायला हवे. गिरीश महाजनांवर टीका करणे भाजप विरोधी पक्षाचे म्हणून एकवेळ समजू शकतो. परंतु महाविकास आघाडी पक्षातील एक प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचेवर पालकमंत्री म्हणून टीका करतांना जरा सबुरीने घेतले पाहिजे. एवढेच यानिमित्त सूचवावेसे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.