माजी कुलसचिव कापडणीस हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नाशिक: येथील मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांना ‘चर्चा करायची आहे, कारमध्ये बसा’ असे सांगून संशयित राहुल जगताप याने शहराबाहेर कार नेली. दरम्यान, कारमध्ये चर्चेतून वाद उभा राहिल्याने जगतापने नानासाहेबांना जोरदार ठोशा मारला अन् ते बेशुद्ध पडले.

भंबेरी उडाल्याने राहुलने कार निर्जनस्थळी थांबवून नानासाहेबांच्या चेहऱ्यावर पाणी ओतले अन् त्यांना शुद्धीवर आणले. ‘मला माफ करा…’ असे सांगत पुन्हा वाद घातल्याने दोघांमध्ये ‘भडका’ उडाला. यावेळी जगताप याने त्यांचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासातून झाला आहे.

जुन्या पंडित कॉलनीमध्ये सासू पत्नी व लहान मुलासह राहणारा संशयित राहुल हा गेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत कौटुंबिक तणावाखाली आलेला होता. यामुळे तो व्यसनाधीनदेखील झाला होता. जगताप याने १८ डिसेंबरच्या अगोदर जुना गंगापूरनाका येथून नानासाहेबांना स्विफ्ट कारमध्ये बसविले. यासाठी त्याने चर्चेचा बनाव केला. त्यांच्याशी कारमध्ये वाद घालून त्यांना ठार मारले.

यानंतर नानासाहेब यांच्या खुनाचा उलगडा होऊ नये, यासाठी संपूर्ण खबरदारी घेत त्याने मृतदेह थेट नाशिक जिल्ह्याच्या हद्दीबाहेर आंबोली घाटात नेला. तेथून नानासाहेबांचा मृतदेह दरीत फेकला. तत्पूर्वी त्यांच्या अंगावरील कपडेही त्याने काढून घेतले होते. मृतदेह दोन झाडांमध्ये अडकल्याने संशयित राहुलने वरून मृतदेहावर दगड भिरकावला.

मृतदेह जाळण्याचा विचार डोक्यात आल्यानंतर दरीत उतरणे शक्य नसल्याने त्याने तेथील गवत पेटवून दिले आणि गवताला लागलेली आग दरीत पसरत गेली आणि या आगीमुळे नानासाहेबांचा मृतदेह अर्धवटरीत्या जळालेल्या अवस्थेत मोखाडा पोलिसांना दुसऱ्या दिवशी आढळला होता, असे तपासात पुढे आले आहे.

–इन्फो–

त्र्यंबकेश्वर नाशिकमार्गे अमितच्या मृतदेहाची वाहतूक

१) संशयित राहुल याने अमितचा राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला असे नाही, तर त्यास त्र्यंबकेश्वर तालुक्यात निर्जनस्थळी नेऊन डोक्यात दगड घालून ठार मारल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मृतदेह कारच्या पुढील सीटवर ठेवून टीशर्टने बांधून त्याने रात्री कार नाशिकमध्ये आणली.

२) नाना कापडणीस यांच्या मृतदेह फेकलेल्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास अमितचा मृतदेह फेकायचा नाही, म्हणून त्याने नाशिक-पांढुर्ली-भगूरमार्गे सिन्नर-घोटी रस्त्याने अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. भंडारदरा रस्त्याने वाकी गावातून पुढे जात राजूरपासून काही किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी अमितचा मृतदेह फेकला. तेथे त्याच्या चेहऱ्यावर दारू ओतून चेहरा पेटवून देत पोबारा केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.