“आमचे सरकार आल्यावर ५०% आरक्षणाची मर्यादा काढू; जितकी आवश्यकता लागेल तेवढे आरक्षण देऊ” – राहुल गांधी

0

 

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, भाजपला आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्यात येणार आहे. न्यायालयाने आरक्षणावर ५० टक्के मर्यादा घातली आहे, ती आम्ही काढून टाकू आणि गरीब, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींना जेवढे आरक्षण हवे आहे तेवढे देऊ, असे राहुल म्हणाले.

मध्य प्रदेशातील झाबुआ-रतलाम लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कांतीलाल भुरिया यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले की, भाजप नेते म्हणतात की त्यांचे सरकार स्थापन झाल्यास आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घेतले जाईल.

संविधानाची प्रत दाखवत राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. भाजप आणि आरएसएसला राज्यघटना रद्द करायची आहे आणि ती बदलायची आहे. काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया अलायन्स’ संविधानाचे रक्षण करत आहेत.

ते म्हणाले की, भाजपने संविधान बदलण्याच्या उद्देशाने ‘400 पार’ (लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य) नारा दिला आहे. पण, 400 जागा सोडा, यावेळी भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत.

संविधानाने आरक्षणाचा अधिकार दिला

काँग्रेस नेते म्हणाले की, राज्यघटनेने जल, जंगल आणि जमीनीचे सर्व अधिकार दिले आहेत. मोदी सरकारला तुमचे हक्क हिसकावून घ्यायचे आहेत, हे त्यांचे ध्येय आहे. आम्हाला आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांचा सहभाग वाढवायचा आहे. आम्ही ठरवले आहे की जातीची जनगणना केली जाईल. यामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफीही होणार आहे. तरुणांना त्यांची पहिली पक्की नोकरी मिळेल, ज्यामध्ये त्यांना एका वर्षासाठी दरमहा साडेआठ हजार रुपये मिळतील. त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास महिलांना लखपती बनवण्यासाठी त्यांच्या खात्यात दरमहा ८,५०० रुपये देण्यास सुरुवात करेल, असेही राहुल गांधी म्हणाले.

आदिवासीबहुल रतलाम-झाबुआ मतदारसंघातून काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भुरिया यांना भाजपच्या अनिता नगर चौहान यांच्या विरोधात उभे केले आहे. 13 मे रोजी येथे मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.