सेना-भाजप विश्वासात घेईना; दादांचे कार्यकर्ते नाराज !

सुनील तटकरेंकडून डॅमेज कंट्रोल

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

महायुतीतील भाजप-शिवसेनेकडून विश्वासात घेतले जात नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चेमुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये धाव घेतली. त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करीत ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नसल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी नाशिकमध्ये येऊन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काही पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, माजी खासदार देवीदास पिंगळे, शिवराम झोले, विष्णुपंत म्हैसधुणे, नाना महाले, रवींद्र पगार, प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे या प्रमुख नेत्यांसह पत्रकार परिषद घेतली. त्यात पदाधिकारी नाराज असल्याची त्यांनी कबुली दिली व नाराजी स्वाभाविक असल्याची पुस्तीही जोडली. मात्र, आता आपण सर्वांशी बोललो असून, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, तटकरे यांनी सायंकाळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली. भुजबळ नाराज नसून, त्यांनी स्वत:हून कार्यकर्त्यांची समजूत घातल्याचे तटकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. तटकरे नाशिकमध्ये असून, पदाधिकारी-कार्यकर्ते प्रचारास सक्रीय व्हावेत, यासाठी भेटीगाठी घेणार असल्याचे कळते.

उमेदवारी विलंबामुळे कार्यकर्त्यांत शैथिल्य

महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे कार्यकर्त्यांना शैथिल्य आले होते, अशी कबुली तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांत कोणताही संभ्रम नाही. पदाधिकारी नाराज होणे स्वाभाविक आहे. जिल्ह्याला सर्वाधिक आमदार देणाऱ्या पक्षाला विश्वासात घेतले जावे, असे म्हणणे पदाधिकाऱ्यांनी मांडले. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने ते प्रचारासाठी आले नाहीत. म्हणून आपण स्वत: आलो आहोत, असे तटकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.