मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू असून, त्यांनी दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे. गुवाहटीमध्ये शिवसेना बंडखोर दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आमच्याकडे बहुमत आहे, आमचा पक्ष शिवसेना; असे म्हणत बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा सांगण्यात आला आहे.
आम्हीच शिवसेना आहोत
आम्हीच शिवसेना आहोत. आम्ही विधिमंडळात निवडून आलोत. आम्ही कशाला आमचाच पाठिंबा काढू. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांना कुणीतरी काढण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेनेला कोणीही हायजॅक केले नाही. आम्ही शिवसेनेच्या विचाराचे, बाळासाहेबांच्या विचाराचे. आमचा पक्ष, आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा आणि हायजॅक करण्याचा प्रयत्न केला गेला.
.. लोकशाहीची हत्या आहे
पक्षांतरबंदी कायदा लागू होऊच शकत नाही. ओढून-तोडून कायदा लागू करणे लोकशाहीची हत्या आहे. आम्ही महाराष्ट्रात आले पाहिजे, पण राऊत म्हणतात रस्त्यावर उतरणार. अशावेळेला आठवण करून द्यायचीय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. तेव्हा कोणाच्याही बद्दल आकस न बाळगता कर्तव्य पार पाडावे. कायद्याचे पालन पार पाडावे.
त्यांच्याकडे बहुमत नाही
आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, आम्ही शिवसेना आहोत. आम्ही अजून कसलाही दावा केला नाही. आम्ही इतकेच म्हणतोय, आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. शिवसेनेत राहणार आहोत. सोळा ते सतरापेक्षा जास्त लोक त्यांच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे बहुमत नाही. माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, आज जे महाराष्ट्रात दंगे सुरू आहेत. त्यांनी एक आवाहन केले, तर ते बंद होतील. हे दंगे त्यांनी थांबवावेत, असे अवाहन दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत
एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलंय की अधिकृतपणे तुम्ही माध्यमांशी संवाद साधा. एक गैरसमज असा आहे की, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो आहोत. पण आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. सरकार चांगले चालावे यासाठी आम्ही पक्षप्रमुखांना अनेकदा विनंती केली, कित्येक दिवस आम्ही उद्धव ठाकरेंना हे सांगत होतो. आमची अजूनही समजूत आहे की, ते ऐकतील.
.. ते बहुमत आमच्याकडे आहे
आम्हाला कोणीही असे सांगितले नाही की, असे तुम्ही करा. आम्हाला एकनाथ शिंदे हे स्वत: उद्धव ठाकरेंनी नेते म्हणून दिले आहेत. दोन तृतीयांश बहुमताचा जो मुद्दा आहे तो घटनात्मक आहे. आपलं वेगळे म्हणणे मांडण्यासाठी ते लागते. ते बहुमत आमच्याकडे आहे. 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 लोकांना बदलता येत नाही. जो काही निर्णय उपाध्यक्ष झिरवाळांनी दिला आहे त्याला आम्ही कोर्टात चॅलेंज देणार आहोत.
माझे तमात शिवसैनिकांना आवाहन आहे की..
तुम्हाला जर पक्षाने विधानसभेसाठी व्हिप काढला तर आणि तुम्ही अबसेंट राहिलात तर तो व्हिप लागू होतो. असा बाहेर लागू होत नाही. आमच्यापैकीच एक जण गटनेता होतो, प्रतोद होतो, अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो. आम्ही कुणीही पक्ष सोडलेला नाही, जी रस्त्यावर उतरण्याची भाषा केली जात आहे, ती अत्यंत चुकीची आहे. माझे तमात शिवसैनिकांना आवाहन आहे की, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, बाळासाहेबांचे विचार पुढे नेले जातील.
आमचे म्हणणे रीतसर मांडू
आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. आम्हाला जी 48 तासांची नोटीस बजावली आता शनिवार, रविवार आहे. एवढी कोणतीही इमर्जन्सी नव्हती. त्यांनी नियमाप्रमाणे एका आठवड्याची मुदत द्यायला हवी होती. यासाठी आम्ही उपाध्यक्षांना विनंती करू. मुळात या कारणासाठी अशी नोटीस काढता येणार नाही. तरीही आम्ही त्यांच्याजवळ आमचे म्हणणे रीतसर मांडू. असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे पुढेही आमचे ऐकतील ही अपेक्षा
जिथे शिवसेना दोन नंबरला होती, तिथे राष्ट्रवादीला ताकद दिली जात होती, म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आमचा आग्रह होता. त्यांनी तसे आश्वासन द्यायला पाहिजे होते की, तुमच्या उमेदवाराला धक्का लागणार नाही. उद्धव ठाकरे पुढेही आमचे ऐकतील ही आमची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल खूप प्रेम आहे. म्हणून शिवसेना आणि भाजपने एकत्र आले पाहिजे अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. शिवसैनिकांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडून खूप अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण झाल्या नाही, असा आरोप दीपक केसरकरांनी केला आहे.