बायकोला झाला सर्पदंश अन् सापालाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला नवरा

0

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

साप म्हटलं म्हणजे अंगाला काटा येतो.. सापांबाबत आपण किस्से ऐकले असतील. तसेच एखाद्याला साप चावला की त्या व्यक्तीला वाचवण्याची धडपड सुरु होते. पण सध्या एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने त्याच्या बायकोला साप चावताच सापाला घेऊन तो रुग्णालयात पोहोचला. सर्पदंशामुळे बायको वेदनेने किंचाळत होती आणि नवऱ्याने सापाला जिवंत पकडलं आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील आहे.

उन्नावच्या अफजाल नगरमध्ये राहणारा रामेंद्र यादव ज्याच्या बायकोला सकाळी साप चावला. काहीतरी चावल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर तिला वेदना होत होत्या. त्यानंतर तिने तिथं सापाला पाहिलं आणि तिला घामच फुटला. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिचा नवरा आणि घरातील इतर लोक धावत आले. सापाला पाहून तेसुद्धा घाबरले.

दरम्यान महिलेच्या नवऱ्याने सापाला पकडलं आणि एका बाटलीत बंद केलं. त्यानंतर बायकोला घेऊन त्याने तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली पण हॉस्पिलला जाताना त्याने बाटली बंद केलेल्या सापालाही सोबत घेतलं. हे आश्चर्य !

यावेळी रामेंद्रला सापाला हॉस्पिटलमध्ये का आणलं असं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, साप चावल्याच्या अशा प्रकरणात ग्रामस्थांसोबत मी याआधी रुग्णालयात आलो आहे. त्यावेळी डॉक्टरांनी कोणता साप चावला असं विचारलं होतं. कोणत्या सापाने दंश केला हे समजल्यानंतरच डॉक्टर इंजेक्शन देतात. बहुतेकांना साप कोणता होता हे माहिती नसतं त्यामुळे काही लोकांचा उपचार न मिळाल्याने जीवही जातो. त्यामुळेच मी माझ्या पत्नीला साप चावताच तिच्यासह तिला डसणाऱ्या सापालाही सोबत घेऊन आलो.

या प्रकरणात सीएमएसने सांगितलं की, महिलेच्या पतीने सापालाही सोबत आणलं होतं, यामुळे डॉक्टरांना उपचार करणं सोपं झालं. कारण साप विषारी आहे की नाही हे आम्हाला समजलं. आता महिलेची प्रकृती ठिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.