वृद्धेची ९ लाखात ऑनलाईन फसवणूक; संशयित अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील हायवेदर्शन कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या वृध्द महिलेची ९ लाख ६२ हजार १८१ रुपयांत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताला जळगाव साबयर पोलिसांनी अटक केली आहे. दिपक सुभाष अहिरे रा. निभोंरा. ता. सोयगाव जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील हायवेदर्शन कॉलनीतील नलीनी राजाराम देसाई (वय ६२) यांच्या पतीच्या निधनानंतर निराधार योजनेतंर्गत नलीनी यांना एक हजार रुपये पेन्शन मिळायची. ही पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायची. त्यांच्या घरात राहत असलेला भाडेकरु दिपक अहिरे हा नलीनी यांना बँकेच्या खात्यातून पैसे काढून देण्यासाठी मदत करायचा. काही दिवसांनंतर मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होत असल्याने नलीनी देसाई यांनी त्यांचे घर विक्री केले. त्यातून मिळालेल्या पैशांचा धनादेश संबंधितांने नलीनी यांच्या बँक खात्यावर जमा केला होता.

दरम्यान घर विकल्यानंतर नलीनी हृया त्यांच्या शिरपूर येथील बहिणीकडे राहत आहेत. ९ जून रोजी नलीनी ह्या नेहमीप्रमाणे बँकेत पेन्शन काढण्यासाठी आल्या असता त्यांना त्यांच्या घराच्या विक्रीतून मिळालेले ९ लाख ५० हजार रुपये खात्यावर दिसून आले नाही. बँकेत विचारणा केल्यावर कुणीतरी अनोळखी व्यक्तीने २० जानेवारी ते २० मे २०२२ दरम्यान वेळावेळी युपीआयव्दारे ऑनलाईन पैसे काढून घेतल्याचे लक्षात आले. याबाबत नलीनी देसाई यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरुन ९ जून रोजी गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यात नलीनी यांच्या बँकेच्या संलग्नित मोबाईल क्रमाकांचे कॉल डिटेल्स, बँक खात्याची माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपास करत फसवणूक ही निंभोरा येथील दिपक अहिरे याने केल्याचे निष्पन्न झाले होते, त्यानुसार पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप चिंचोले, दिप्ती अनफाट, गौरव पाटील, दिपक सोनवणे व श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने शुक्रवारी दिपक सुभाष अहिरे यास अटक केली.

दिपक अहिरे याने वृध्द महिलेचे सीमकार्ड जुने झाल्याचा बहाणा करत ते स्वत:जवळ ठेवले. तसेच त्यावरुन युपीआय आयडीव्दारे नलीनी यांच्या बँक खात्यावरुन एकूण ९ लाख ६२ हजार १८१ रुपये काढून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संशयितास जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.