नवनीत राणांच्या उमेदवारी आधीच महायुतीत नाराजीचा सूर; मित्रपक्षानेच घेतला रवी राणांचा समाचार

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

खासदार नवनीत राणा यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यासारखेच आहे. मात्र उमेदवारी घोषित होण्याआधीच अमरावती जिल्ह्यात महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा यांनी इशारा दिल्यानंतर महायुती मधील शिवसेनेचे (शिंदे गट) अभिजीत अडसूळ, प्रहारचे आमदार बच्चू कडू व भाजपाचे नेते तुषार भारतीय यांनी राणादांपत्यावर जोरदार निशाणा साधला.

एन.डी.ए मध्ये असणारे सर्व नेते नवनीत राणा यांचा प्रचार करतील, त्यांना मी एका मंचावर आणेल आणि त्यांना नवनीत राणा यांचा प्रचार करावाच लागेल, असा इशारा रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात दिल्यानंतर महायुती मधील सगळेच पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. अभिजीत अडसूळ यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याला भीक घालत नाही असे म्हटले. तर आमदार बच्चू कडू यांनी तर मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस पेक्षा रवी राणालाच घाबरतो असा मिश्किल टोला लावला. भाजप नेते तुषार भारतीय यांनी रवी राणा हे वैफल्यग्रस्त झाले आहे अशी टीका केली.

रवी राणा यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल प्रतिक्रिया देत राणा दाम्पत्यांची खिल्ली उडविली. यावेळी बच्चू कडू म्हणाले की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पेक्षा मी रवी राणांना घाबरतो. सध्या खूप भीतीच वातावरण तयार झालं आहे. “त्यांनी सांगितलं की मंचावर उपस्थित रहावच लागेल” मला कार्यकर्त्यांचे अनेक फोन आले. एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते. उद्या आमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. चौकशी लागू शकते. देवेंद्र फडवणीस यांना राणा भेटून आल्यानंतर ते जोरजोरात बोलतात, त्यामुळे आम्हाला भीती आहे, आम्ही घाबरलेलो आहे. आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावे लागेल, प्रचार करावा लागेल, आमची मोठी नामुष्की होईल, एकंदरीत हे फार कठीण झाले असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

आमदार रवी राणा यांच्या इशाऱ्यानंतर भाजपमधून देखील नाराजी व्यक्त केल्या जात आहे. भाजप नेते तुषार भारतीय त्यांनी देखील रवी राणांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की आमदार रवी राणा यांनी महायुतीचा उमेदवार पडावा याबाबत सुपारी घेतली आहे का ? असे सध्या वाटायला लागले आहे. कारण आपल्या आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अशा पद्धतीची भाषा कोणी करत नाही. मला याबाबतची खात्री आहे. या वक्तव्याची माहिती महायुतीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेल्यावर ते याबाबत दखल घेतील. दुसरी बाब अशी की रवी राणांनी अशा पद्धतीने बोलणे आणि तेही महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये जिथे महिला मंडळ आया-बहिणी उपस्थित असतात. या ठिकाणी अशी मगरुरीची भाषा करणे योग्य नसल्याचे व मला याची देखील खात्री आहे की रवी राणा हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळेच ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील. या वक्तव्यांमधून महायुतीचा उमेदवार पाडणे हाच त्यामागील उद्देश असल्याचे देखील यावेळी स्पष्ट होत आहे. मात्र अशा पद्धतीने वक्तव्य करून उमेदवार निवडून येत नसतो असे तुषार भारतीय म्हणाले .

Leave A Reply

Your email address will not be published.