.. तर मातोश्रीवर येवून भेटा, माफ करू ! – आदित्य ठाकरे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे शिवसेनेला (Shivsena) लागोपाठ धक्के बसत आहेत. तसेच एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) शिवसेनेतून बंडखोरी केल्याने शिवसेनेला उभी फूट पडली. दरम्यान आज आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना आवाहन केले आहे.

जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील, असे वक्तव्य निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले. राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचे प्रेम घ्यायला आलोय. मन, ह्रद्य जोडणे जे आहे ते शिवसैनिकांसोबत आहे. ज्यांची निष्ठा उद्धव ठाकरेंवर आहे ते मातोश्रीवर येतात. ज्यांचे प्रेम असेल, जे निष्ठावान असतील. ते मातोश्रीवर येतील, त्यांना माफ करू, निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील.

एकिकडे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आपण अद्यापही शिसेनेतच आहोत. आपण उद्धव ठाकरे यांनाच नेता मानतो अशी वक्तव्ये सुरु केली आहेत. जर उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ असे विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले होते. तसेच आज शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास जाऊ असे म्हटले आहे. परिणामी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.