जळगाव मनपाकडून शहर वासीयांची क्रूर थट्टा..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव नगरपालिकेचे (Jalgaon Municipality) 2003 मध्ये महानगरपालिकेत (Corporation) रूपांतर झाल्यानंतर जळगाव (Jalgaon) वासियांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. विशेषतः मूलभूत नागरिक सुविधांबरोबरच गेल्या चार वर्षात जळगाव शहराचे (Jalgaon City) वाटोळे झाले आहे. शहराला कोणी वालीच उरलेला नाही. माजी मंत्री सुरेश दादा जैन (Former Minister Suresh Dada Jain) यांच्या नेतृत्वात जळगाव शहराचा कायापालट होईल, असे चित्र निर्माण होत असतानाच सुरेश दादांचे नेतृत्वाच्या राजकीय खच्चीकरण झाले. त्यानंतर जळगाव शहरासाठी योग्य नेतृत्व लाभले नाही. त्यामुळे सुंदर, स्वच्छ, हिरवेगार जळगाव शहराचे स्वप्न भंगले. गेल्या चार वर्षापासून तर जळगाव वासियांची वाताहत सुरू आहे. आपण शहरात राहतो की, एका खेडेगावात ? असा जळगाव वासियांना प्रश्न पडला आहे. अनेक समस्यांचा डोंगर जळगाव वासियांसमोर उभा आहे. या समस्यांचा पाढा वाचला तर त्याची गिनीज बुकात नोंद होऊ शकते. महानगरपालिका केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहे का ? लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा ताळमेळ नाही.

गेल्या चार वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजना (Amrut water supply scheme) आणि भुयारी गटार योजनेच्या (Underground sewer scheme) नावाखाली शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचते. चिखलामुळे शहरवासीयांना कसरत करावी लागते. काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. उन्हाळ्यात जळगावचे नाव बदलून धुळगाव करण्याची मागणी होत होती. या धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढले आहेत. रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर असताना लोकप्रतिनिधींच्या हेव्यादाव्यामुळे कामे होत नाहीत. रस्त्यांच्या प्रश्नांबाबत माध्यमातून आवाज उठवला तर त्याचा चोथा झाला आहे. महानगरपालिका प्रशासनाला त्याचे कसलेही सोयरे सुतक नाही. आता पावसाळा संपेपर्यंत जळगाव वासियांना रस्त्यातील खड्डे-चिखलांशी सामना करावा लागणार आहे. रस्त्यांची समस्या सुटता सुटेना.

दुसरीकडे जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे (National Highways) अपघातांची (Accident) मालिका सुरू होती. अपघातात अनेक जणांचा किड्या मुंग्यांसारखा मृत्यू होत होता. म्हणून शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी शहरवासीयांनी आंदोलन केले. त्यानंतर कसेबसे खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतच्या आठ किलोमीटरचे चौपदरीकरण झाले. चौपदरीकरणही सदोष झाल्यामुळे अपघात होतच आहेत. आता शिवाजी चौक (Shivaji Chowk), इच्छा देवी चौक (Ichcha Devi Chowk) आणि अजिंठा चौफुलीवर (Ajanta Chaufuli) उड्डाण पूल हवे होते. परंतु तेथे करण्यात आलेल्या रोटरी सर्कलवर (Rotary circle) सुरुवातीपासूनच सातत्याने अपघात होत आहेत. कसेबसे चौपदरीकरण झाले असले तरी महानगरपालिकेतर्फे अद्याप सर्विस रोड केले नसल्याने वाहतुकीत कोळंबा होत आहे. त्यात चौपदरीकरणावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी भरधाव वाहने एकमेकांवर धडकून तसेच दुभाजकाला धडक देऊन अपघात होतात. पथदिव्यांचा निविदा लाल फितीत अडकल्यामुळे त्याचे काम झाले नाही, ही शोकांतिका आहे.

मुख्य शहराला आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाबाबत (Shivajinagar Railway Flyover) जेवढी टीका टिप्पणी झाली त्याबाबत लोकप्रतिनिधी अथवा महापालिका प्रशासनाला ना खंत, ना खेद. शासनाच्या अधिकाऱ्यांना गेंड्याच्या कातडीची उपमा दिली जाते, ते याबाबत तंतोतंत लागू पडते. लोकप्रतिनिधी संवेदनहीन बनले आहेत. या पुलाच्या निमित्ताने हे स्पष्ट झाले. शहरातील पिंपराळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने त्या परिसरात वाहनांची कोंडी होतेच आहे. शहरातील स्वच्छतेबाबत ओरड चालू आहे. नशीब नव्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करून हिसका दाखवला, परंतु स्वच्छतेचा ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीवर मात्र अद्याप कारवाई होत नाही. चार वर्षे झाली तरी अमृत योजनेचे पाणी अद्याप शहरवासीयांना मिळत नाही. पथदिव्यांची समस्या असताना लावलेले एलईडी पथदिवे रात्रंदिवस चालू असतात. हा भोंगळपणा नव्हे काय ? पावसाळ्यात गटारीचे पाणी तुंबून घरात घुसते आहे. तक्रारींची दखल घेतली जात नाही.

जळगाव वासिय अनेक समस्यांना सामोरे जात असताना महानगर पालिकेतील पोरखेळ संपत नाही. त्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे चार वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेची निवडणूक झाली. वर्षभरात शहराचा विकास झाला नाही, तर आमदारकीच्या निवडणुकीत ते मते मागायला येणार नाही, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी शहरवासीयांना दिले होते. जळगाव वासियांनी गिरीश महाजनांच्या आव्हानाला आवाहनाला प्रतिसाद देऊन भाजपला भरघोस मतदान केले. 75 पैकी 57 भाजप नगरसेवकांना निवडून दिले. संपूर्ण महानगरपालिका भाजपच्या ताब्यात विशेषतः गिरीश महाजनांच्या नेतृत्वात सुपूर्त करण्यात आली. विरोधक औषधासाठीच शिल्लक होते. परंतु जळगाव वासियांची स्वप्न भंगली. भाजपचे नगरसेवक आपापसातच भांडत बसले. शंभर कोटी रुपयांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला, परंतु तो 100 कोटी निधी वापरलाच गेला नाही. त्यानंतर राज्यात सत्ता पालट झाली. महाविकास आघाडी सरकार आली. महाजनांच्या ठिकाणी सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्री (Gulabrao Patil)  झाले.

दरम्यान दोन वर्षे कोरोनामुळे (Covid 19) सर्व कामे ठप्प झाले पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून विकास कामे केल्याचे सांगण्यात येत असले तरी केळगाव शहरात मात्र समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढावे, त्यांनाही शक्य झाले नाही. महानगरपालिकेत सत्तांतर घडवून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी राजकीय सत्तेचा वापर झाला. परंतु सत्तांतरानंतरही येरे माझ्या मागल्या अशी स्थिती जळगाव वासियांची झाली आहे. आता राज्यात पुन्हा सत्तांतर झाले आहे. गिरीश महाजन यांचे मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील सुद्धा मंत्री होणार असल्याची चर्चा आहे. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या जोडीकडून डबल धमाक्याची जळगावकरांनी अपेक्षा करायला हरकत नाही. पाहूया काय होते..! घोडे मैदान जवळ आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.