लोकसंख्या वाढ : एक गंभीर समस्या

एक परिवार, एक वारसदार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून पाळला जातो. याच दिवशी जन्माला आलेल्या बाळाची गणती केल्यानंतर अख्या जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. त्यामुळे लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी जगामध्ये वेगवेगळ्या देशांनी पावले उचलायला सुरुवात केली. जगात चीन (China) व भारत (India) देशाची लोकसंख्या विचारात घेतल्यास जगाच्या निम्मी लोकसंख्या दोन देशात दिसून येते, त्यामुळे चीन देशासह भारत देशाने देखील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. जर भारत देशाने लोकसंख्येवर नियंत्रण राखले नाही तर पुढील दशकात भारत चीनलाही लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकू शकते त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा वा सुधारणा करण्यापेक्षा समाजात प्रबोधन, जनजागृती उपक्रम राबवून जनतेच्या मनातील अज्ञान दूर करणे आवश्यक आहे. मुलगा-मुलगी हा भेद न करता ‘एक परिवार, एक वारसदार’ ही संकल्पना जनसामान्यात राबविणे गरजेचे आहे.

जगाच्या तुलनेत विचार केला असता चीन हा देश लोकसंख्येच्या अग्रस्थानी सध्या आहे. चीन देशातील कायदा, प्रबोधन बघता भारत देशाला त्यांचे अनुकरण करायला हवे अन्यथा सध्या श्रीलंका देशात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे, त्याचप्रमाणे भारत देशात देखील अराजकता माजायला वेळ लागणार नाही हे मात्र विशेष आहे.  त्यामुळे वेळीच पावले उचलून जन्मदर रोखण्यासाठी जनतेमध्ये सामाजिक जागृती करणे अगत्याचे आहे. दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते.

भारत देशाचा प्रजनन दर पूर्वीपेक्षा अर्ध्यावर आलेला आहे अशीच स्थिती व्हायला हवी. जनतेमध्ये लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी सक्ती करण्याऐवजी जनतेला लोकसंख्या साक्षर करून मतपरिवर्तन करायला लावणे गरजेचे आहे. चीन देशाने लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कायदा निर्माण करून सक्ती करण्यात आली. चीन देशाचा नारा म्हणजे “हम दो, हमारे दो” अशी सक्ती प्रत्येक कुटुंबाला दिली गेली आहे तरी देखील लोकसंख्या नियंत्रणात आणणे त्या देशाला शक्य झाले नाही.  त्यामुळे भारत देशाने प्रजनन बालमृत्यूदर कमी करून कुटुंबनियोजन व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे त्यासाठी आरोग्य व शैक्षणिक सुविधेत वाढ करायला हवी.

१९६० च्या दशकात कुटुंबनियोजन (Family planning) व संतती नियमन ही संकल्पना आली होती, पण पाहिजे त्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी झाले नाही. पण आता लोकांच्या मनातील अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरेला छेद देत लोकसंख्या नियंत्रणात राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी पुढाकार घ्यायला हवा. मुले ही ईश्वरी देणगी आहे ही रूढ पद्धत बाजूला सारून “छोटे कुटुंब,सुखी कुटुंब” ही भावना भारतातील प्रत्येक कुटुंबात रुजायला हवी. संतती नियमन होण्यासाठी डॉ. रघुनाथ कर्वे यांनी समाजप्रबोधन करण्याचे उत्तम कार्य हातात घेतले त्यांचा अवलंब आज करण्याची गरज आहे.

जर लोकसंख्या अधिकाधिक वाढत असल्यास मनुष्याच्या जीवनमानावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्येचा विस्फोट होत आहे त्याप्रमाणे जमीन, उत्पन्न वाढत नाही आहे. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन विविध आजारांना बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसंख्या अमाप वाढल्यास शैक्षणिक सोयी, आरोग्य, वाहतुकीची साधने उपलब्ध होणार नाही. गर्दी वाढेल, अपघातांचे प्रमाण वाढेल, हाताला काम मिळणार नाही. बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढत जाईल तसेच लोकसंख्या वाढल्याने अधिक घरे तयार करण्याच्या नादात जंगलतोड देखील मोठया प्रमाणात होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यास मानव प्राणी व आजची लोकसंख्या वाढ कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या बुद्धीला पटेल असेच वर्तन करून ‘ एक परिवार, एक वारसदार’ हेच आजच्या लोकसंख्या वाढीला कात्री लावण्यास व लोकसंख्या वाढीला लगाम लावू शकेल.

शब्दांकन – दुशांत बाबुराव निमकर

     गोंडपीपरी जिल्हा चंद्रपूर

     मो. नं.  ९७६५५४८९४९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here