“युवराजांची नेहमीच दिशा चुकली”; आदित्य ठाकरेंवर निशाणा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज शेवटचा दिवस असल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळीच सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कार्टून असलेला बॅनर हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा परमपूज्य (प.पु) असा उल्लेख करत त्यांचा चांगलाच  समाचार घेतल्याचे दिसून आले.

हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली

शिंदे गटातील (Eknath Shinde Group) आमदारांनी आदित्य ठाकरेंचे कार्टून असलेला बॅनर सभागृहाबाहेर झळकवत जोरदार घोषणाबाजी केली होती. युवराजांची नेहमीच दिशा चुकली, महाराष्ट्राचे परमपूज्य (प.पू ) असा उल्लेख बॅनरवर करत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच २०१४ मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली असे देखील या बॅनरवर लिहिण्यात आले. घरात बसून पर्यटन खातं चालवलं आणि सत्ता गेल्यावर पर्यटनाची लहर आली, पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन आणि स्वत: आमदार होण्यासाठी महापौर आणि दोन आमदारांची लागते कुशन असा घणाघात देखील यावेळी विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर बॅनरबाजीतून केला आहे.

मला त्यांची कीव येते- आदित्य ठाकरे 

अधिवेशनापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या आंदोलनाचा जोरदार समाचार घेतला. पायऱ्यांवर ज्यांना उभ केलेलं मला त्यांचं वाईट वाटत, कीव येते. ५० खोके वेगैरे मला लोकांमधून ऐकू येतंय पण त्यांना जी खरी अपेक्षा होती. मंत्रिपद मिळाली नाहीत म्हणून त्यांना इम्प्रेस करायला माझ्यावर बोलावं लागतंय असा टोला आदित्य ठाकरे यांनी पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या आमदारांना लगावला. गळ्यात काय काय घालून पायऱ्यांवर उभं राहावं लागतंय. मला त्यांची कीव येते. गद्दारी ही महाराष्ट्राला पटलेली नाही त्यांनाही कळतंय की जनतेचा त्यांना पाठींबा नाही. असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

तर मला त्यांचं कौतुक वाटलं असतं

आज तर ते याच पायऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उभे असते, महिलांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी उभे असते किंवा तरुणांचे विषय असतील असे प्रश्न घेऊन जर ते उभे असते तर मला त्यांचं कौतुक वाटलं असतं. आम्ही तुमच्यासाठी काय कमी केलं असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.