लग्नावरून परततांना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू…

0

 

गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ वर्षाच्या चिमुकलीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. ही दुर्देवी घटना ठाकणी ते भागवत टोला रस्त्यावर घडली. अपघातानंतर मात्र ट्रकचालक घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाला.

लग्न आटोपून ते दुचाकीवरून घरी परतत असताना, ठाकणी ते भागवत टोला परिसरात समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन मुलांसह वडिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, रामनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या चिमुकलीला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचाही मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

आदित्य बिसेन (७), मोहित बीसेन (११), कुमेंद्र बिसेन (३७) सर्व राहणार रा. दासगाव, आणि आर्वी कमलेश तूरकर (वय ५ वर्ष, नात्यातील मुलगी) रा. चुटिया, अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बिसेन कुटुंबीय जिल्ह्यातील पिंकेपार येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.