शेतात पुरलेला हात बॉम्ब फुटला; महिला गंभीर…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथे शेतामध्ये निंदणी करत असतांना महिलेचा गावठी बनावटीच्या हात बॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याच्या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. जखमी महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिला जळगाव येथे हलवण्यात आले. रानडुकरांच्या शिकारीच्या उद्देशाने फासेपारधींनी हातबॉम्ब शेतात पुरल्याचा संशय आहे.

बोरावल बुद्रुक, ता.यावल शिवारात नरेश लक्ष्मण जावळे (रा.राजोरा) यांचे शेत असून, शुक्रवारी या  शेतात महिला मजुर निंदणी करीत असताना बेबाबाई पंडित सोनवणे (55) रा.राजोरा या महिलेला एक गोळा आढळला व महिलेच्या स्पर्शाने छेडछाडदरम्यान गोळ्याचा विस्फोट होवून त्यात बेबाबाई सोनवणे यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली. या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटं तुटली आहेत. ब्लास्टनंतर शेतातील इतर मजुर महिला या सैरावैरा पळाल्या.

नरेश जावळे यांनी जखमी अवस्थेतील महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

शेतासह परीसरात फासेपारधींकडून रानडुकरांच्या शिकारीसाठी अशा पद्धतीने गावठी बनावटीचे हात बॉम्ब बनवून जमिनीत पुरले जातात. शेत मशागतीत हा बॉम्ब जमिनीत गाडला गेल्याचा अंदाज असून महिलेने त्यास स्पर्श करून छेडछाड केल्याने त्याचा ब्लास्ट झाल्याचे शेतकरी नरेश भंगाळे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.