हृदयद्रावक; साखरपुड्याच्या खरेदीस गेलेल्या तरुणीचे अपघाती निधन…

0

 

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

एखाद्याला नोकरी मिळणं सध्याच्या दिवसांमध्ये किती अवघड कार्य झाल आहे. त्यात ती अत्यंत काबाड कष्ट करून सीआरपीएफमध्ये नोकरीला लागली आणि तिची मुंबईत नियुक्ती झाली. याउपर तिचं लग्नही आता ठरलं. साक्षगंधसाठी (साखरपुडा) ती आपल्या गावी आली. आणि त्यात साक्षगंधाची तयारी सुरू होती. साक्षगंधासाठी बॅग खरेदी करता यावी म्हणून ती भावासोबत बाइकवरून गेली. मात्र, नियतीला काही वेगळाच मान्य होतं. समोरून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने त्यांची बाइक खाली पडली आणि तेवढ्यात मागून येणाऱ्या ट्रकने तिचं डोकं चिरडलं. या अपघातात तिचा मृत्यू झाला. तर भाऊ गंभीर जखमी झाला.

ही हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. किरण सुखदेव आगाशे (25) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (21) असं जखमी तरुणाचं नाव आहे. ते मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथील राहणारे आहेत.

किरण ही मुंबईत सीआरपीएफ कॅम्पमध्ये नोकरीला होती. ती आपला लहान भाऊ लोकेशसोबत तुमसर येथे बॅग खरेदीसाठी आली होती. खरेदी करून दुचाकीने ते (एमएच 36 ए 6693) निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ बहीण रस्त्यावर पडले.

दरम्यान मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि ती जागीच ठार झाली. त्यामुळे काही क्षणातच घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला. किरणच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला होता. तर भाऊ लोकेश हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.