उन्मेष पाटलांचा हल्लाबोल, उशिरा सुचलेले शहाणपण..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

भाजपमध्ये पाच वर्षे आमदार आणि पाच वर्षे खासदार राहिलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून उन्मेष पाटील यांनी ग्रामविकास मंत्री व भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे विरोधात आरोप केले. जळगाव लोकसभा मतदारसंघातून यंदा उन्मेष पाटलांची उमेदवारी रद्द केली. त्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. खासदारकीची उमेदवारी मिळत असताना ती नाकारून त्यांनी त्यांचे कट्टर समर्थक मित्र पारोळ्याचे माजी नगरसेवक करण पवार यांना उमेदवारी देण्याची सुचवले. उन्मेष पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच काल जळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात टिकेची झोड उठवली. त्यानंतर दोघांवर टीका करण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यामागे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांचा हात आहे, असे उन्मेष पाटलांना वाटते.

ऐन लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात तिकीट मिळाले नाही, म्हणून भाजपचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या उन्मेष पाटलांनी महाजन, चव्हाण यांचेवर केलेल्या आरोपाचा फायदा होईल, असे उन्मेष पाटलांना वाटत असेल तर ते काळच ठरवेल. भाजपात असताना गिरीश महाजनांवर बोलण्याची हिंमत उन्मेष पाटलांनी का केली नाही? हा खरा प्रश्न आहे. खासदारकीचे तिकीट रद्द होईपर्यंत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमने वाहणाऱ्या उन्मेष पाटलांना तिकीट मिळाले नाही, म्हणून त्या पक्षाच्या विरोधात बोलणे यावर लोक कितपत विश्वास ठेवतील? भाजपात असताना गिरीश महाजनांचे विचार पटले नाहीत अथवा त्यांची कृती योग्य वाटली नाही तेव्हा त्यांचे विरोधात उन्मेष पाटील का बोलू शकले नाहीत? त्यांचा हा प्रचार म्हणजे द्राक्ष खायला मिळाले तर ‘कितने अच्छे है अंगूर’ आणि द्राक्ष खायला मिळाले नाहीत तर ‘कितने खट्टे है अंगूर’ या उक्तीप्रमाणे उन्मेष पाटलांचा आरोप म्हणावा काय? पक्षात राहून स्वपक्षीयांची मते पटली नाही तर पक्षात राहून आवाज उठवण्याची हिंमत अलीकडे फारच कमी राजकारणी दाखवतात. किंबहुना हिम्मत करीत नाहीत.

अशातलाच प्रकार उन्मेष पाटलांचा आहे असे म्हणावे का? कालपर्यंत गिरीश महाजनांवर स्तुती सुमने आणि आज विरोधी पक्षात गेल्यावर त्यांच्यावर टीका केली जाणे योग्य आहे का? काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले २०१४ च्या निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून विजयी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पटोले लोकसभा निवडणूक लढवून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून निवडून आले. तथापि भाजपची शेतकऱ्यांविरोधातील ध्येय धोरणे पसंत पडली नाहीत, म्हणून खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपातून बाहेर पडले नाना पटोले यांची ही कृती स्वागतार्ह होती. त्यांचे देशभरात स्वागत झाले. परंतु उन्मेष पाटल आणि नाना पटोले यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही.

उन्मेष पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री आणि मंगेश चव्हाण यांच्या शेतकऱ्यांविरोधातील धोरणावर टीका केली. “जास्त खोलात गेले तर गिरीश महाजनांना जामनेर मधून बाहेर पडणे मुश्किल होईल,” असा खळबळजनक आरोप करून आपल्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामविकास मंत्री भाजप मधील एक ज्येष्ठ नेते आहेत. पक्षात त्यांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. भाजपचे संकटमोचक म्हणून पक्षात त्यांना एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सुद्धा गिरीश महाजनांच्या विरोधात जंग-जंग पछाडले होते. महाजनांची सीडी बाहेर काढू, त्यांना मोक्का लावू, त्यांचे राजकारण संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसे यांचे काय झाले, हे सर्वश्रुत आहे. महाजनांची सीडी तर बाहेर आलीच नाही, परंतु ज्या सरकारी वकिलांच्या माध्यमातून महाजनांवर मोक्का लावण्याची भाषा केली गेली, ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची अवस्था काय झाली, ही घटना ताजी आहे. त्यामुळे “मी जास्त खोलात गेलो तर महाजनांना जामनेर मधून बाहेर पडणे मुश्किल होईल,” असे सनसनी आरोप करणे हे हास्यास्पद म्हणता येईल. जिल्हा बँकेत तोडफोड करून सत्ता मिळवण्याचा उन्मेष पाटलांनी महाजनांवर केलेला आरोप हा एक राजकारणाचा भाग आहे. सत्तेसाठी आज सर्वच पक्षात हे चालू आहे. त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे खळबळजनक आरोप केल्याने त्यातून काही प्राप्त होईल असे आम्हाला वाटत नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.