अधिक खोलात गेला तर जामनेरातून बाहेर पडू देणार नाही !

0

माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गिरीश महाजनांना इशारा : मंगेश चव्हाणांवर देखील टीका

जळगाव ;– गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, शासकीय अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही, पोखरा योजनेचा लाभ नाही, गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी नाही. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत, कॅबिनेटची बैठक होते त्यावेळी हे महाशय झोपा काढत असतात. बाहेर मात्र आपल्यावर टीका करीत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आपण अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा भाजपमधून शिवसेनेत गेलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला आहे.भारतीय जनता पक्षातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, करण पवार, नानाभाऊ महाजन, विराज कावडिया यावेळी उपस्थित होते.

जळगाव जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्यांतर्फे कर्ज देण्याबाबत जे धोरण आखण्यात आले आहे. त्यावर त्यांनी टीका केली. गटसचिवांना दोष देवून त्यांच्यावर बँकेमार्फत अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या या धोरणामुळे आज शेतकरी व गटसचिवांना आत्महत्येची वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासाठी जिल्हा बँकेचे व्यवस्थापन जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
उन्मेश पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय मंत्रीर गिरीश महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जाचा आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांचा जो प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मंत्री म्हणून याकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्यातील 21 हजार शेतकरी आणि साडेतीनशे गटसचिवांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले. अमित शहा त्या खात्याचे मंत्री आहेत. ते शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असतांना जिल्ह्यातील मंत्री मात्र त्यांच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आहेत.

जामनेरबाहेर फिरू देणार नाही
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या आदेशाला जिल्ह्यात हरताळ फासला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी हितासाठी मोठ मोठी घोषणा करीत आहे परंतु त्यांचे दूत असलेले मंत्री गिरीश महाजन मात्र विरोधी निर्णय घेत आहेत. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी काहीही करीत नाही. इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांनी आपला जिल्हा चांगला केला आहे. हे मात्र कॅबीनेटमध्ये काय झोपा काढतात काय? असा सवालही त्यांनी केला. महाजन हे केवळ भाषणे देऊन टीका करीत असतात. त्यांनी आता सांभाळून बोलावे आपण जर खोलात गेलो तर जामनेरमधून बाहेरही निघू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

मंगेश चव्हाणांवरही टीका
दरम्यान, ठेकेदारांना ब्लॅकमेलसह प्रवीण चव्हाण प्रकरणात उन्मेश पाटील यांचा हस्तक्षेप होता म्हणून पक्षाने त्यांचे तिकीट कापले, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला त्यावर बोलताना उन्मेष पाटील म्हणाले की, मंगेश चव्हाण हे राजकारणात साडेतीन वर्षाचे आहेत. त्यांचा अभ्यास नाही. केवळ दिखावूपणा करुन ते मनोरंजन करीत असतात अशी टीका उन्मेष पाटील यांनी केली. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उत्तर देणार, असेही उन्मेष पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.