मन की बात (दीपक कुलकर्णी)
राजकारण हे अटी आणि शर्तींवर चालत असते. आपले राजकीय हित साधण्यासाठी प्रत्येक नेत्याचा अट्टाहास हा असतोच. बिनशर्त राजकारण हे तीन वर्षांपूर्वी होत होते; आता देश अमृत महोत्सव साजरा करीत असतांना असल्या अटी, शर्ती राजकारणात कधीच चालत नाहीत. आजच्या राजकारणात जे काही सुरु आहे ते कमालीचे असेच आहे. सकाळी या पक्षात तर सायंकाळी दुसऱ्या पक्षात अशी आजची स्थिती आहे. उमेदवारी दिली नाही तर लागलीच पक्षश्रेष्ठींवर टीकेची झोड उठविणे, पक्षाला शिव्या घालणे हे नित्याचे झालेले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. त्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नेहमीच्या आपल्या शैलीत मनोगत व्यक्त केले असले तरी कालचे भाषण मात्र ‘ठरवून’ केलेले होते.
भाजप नेत्यांच्या दिल्लीत घेतलेल्या भेटी यावरच ते आपला ‘प्रवास वर्णन’ करणार होते. ‘टाळ्या’ मिळाव्यात म्हणून सुरुवातीला मीडियावर तुटून पडायचे आणि ‘मी नाही त्यातला’ असे दाखवायचे. प्रत्येकावर तोंड सुख घेतांना आपणच तेवढे ‘हुशार’ हे दाखविण्यात राज ठाकरे यांचा हात कुणीही धरणार नाही. गत काळात भाजपला शिव्यांची लाखोळी वाहणारे राज ठाकरे आज कमळाचा सुगंध घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आपण बिनशर्त पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी त्यात काहीही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांना ते मदत करणार असून विधानसभेसाठी मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन टर्मपासून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष लोकसभा निवडणुकीपासून दूर आहे. एखाद्या पक्षाचे अस्तित्व हे निवडणुकांवर ठरत असते; निवडणुकच लढवायची नाही याला काय अर्थ? ‘आपले ठेवावे झाकुन अन् दुसऱ्याचे पाहावे वाकून’ अशीच रित राज ठाकरे चालू ठेवतांना दिसत आहेत. एका पक्षाच्या नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची भेट घेतली की ती बातमी होते हे सर्वश्रृत आहेच. राज ठाकरे यानी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही तशी बातमी झाली. काही पत्रकारीतेतील तज्ज्ञांनी त्यावर भाष्यही केले. याचाच राग राज ठाकरे यांना आला आणि त्यांनी तशी आगपाखड कालच्या मेळाव्यात केली.
मी केवळ बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. मी मनसेचाच प्रमुख राहणार असे जरी ते छातीठोक सांगत असले तरी भाजपच्या दावणीला गेल्यानंतर दिल्लीतील नेतृत्वाच्या हाताखालीच काम करावे लागते हे राज ठाकरे यांच्यासारख्या ‘महान’ नेत्याला ठाऊकच असेल. राज ठाकरे म्हणाले की, या देशातला मी पहिला व्यक्ती होतो, ज्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहीजे, असे म्हटले होते. तेव्हा त्यांच्या पक्षामध्येही याविषयी कुणी बोलत नव्हते. एवढेच होते तर 2019 च्या निवडणुकीत व्हिडीओचे राजकारण कशासाठी केले?
एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही. तर रोखठोक भूमिका घेतो आणि घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो, असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा दिला असे म्हटले असेल तर ते साफ चुकीचे आहे. हल्लीच्या राजकारणात अटी, शर्ती लागू आहेत आणि प्रत्येक राजकारणी त्या स्वत:ला लावूनही घेत असतात. राज ठाकरेंची भूमिका भाजपसाठी फलदायी असली तरी त्यात काहीतरी ‘गोडबंगाल’ मात्र नक्कीच आहे.