बालेकिल्ला राखण्यात अखेर मुख्यमंत्री शिंदेंना यश

जागा मिळाली, पण उमेदवार ठरेना : तीन नावे चर्चेत

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आले आहे. ठाण्याची जागा शिवसेनेचा लढणार असल्याची माहिती पुढे येत आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी जसे मुख्यमंत्रिपद मिळवले, त्याच पद्धतीने ठाणे लोकसभेची जागा स्वतःकडे राखण्यात शिंदे यशस्वी झाल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी, आमदार, माजी लोकप्रतिनिधी गेले. तर खासदार राजन विचारे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. दरम्यान विचारे यांच्यासमोर अद्याप महायुतीने उमेदवार दिलेला नाही. ठाणे लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच चालू होती. मात्र ठाणे लोकसभा एकनाथ शिंदेची शिवसेना लढणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी हा निर्णय येत्या दोन दिवसात होऊ शकतो. लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच ठाणे, मीरा भाईंदर  आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांना पत्र लिहून त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळवली. नरेश म्हस्के सातत्यानं पक्षाची बाजू जोरकसपणे मांडत असतात. तर मीनाक्षी शिंदे माजी महापौर असल्याने त्या ठाणेकरांना परिचित आहेत.

ठाण्यात सेनेची किती ताकद ?

ठाण्यात महायुतीची चांगली ताकद आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची कर्मभूमी राहिलेला ठाणे मतदारसंघ 1996 पासून शिवसेनेकडे आहे. इथून सातत्याने सेनेचे उमेदवार विजयी झाले. दिघेंच्या निधनानंतर शिंदेंनी ठाण्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. पक्षफुटीनंतर बहुतांश माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंसोबत गेले. लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. पैकी 3 जागा भाजप, 2 जागा शिंदेसेना आणि 1 जागा अपक्ष आमदाराकडे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.