सासऱ्यांच्या घरवापसी बाबत सुनबाईंनी सोडले मौन..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात तसेच भाजप वाढीसाठी गेले ३० वर्षे ज्यांनी परिश्रम घेतले ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपातील अंतर्गत कलहामुळे ज्यांना भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या आमदार एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे यांनी भाजपातच राहणे पसंत केले होते. सासरे नाथाभाऊ यांचा हा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगणाऱ्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी गेल्या अडीच वर्षापासून नाथाभाऊंच्या संदर्भात म्हणजे त्यांनी पुन्हा भाजपा यावे म्हणून कधीही जाहीर वक्तव्य केले नाही. तथापि काँग्रेस तसेच इतर पक्षातील नेते भाजपात प्रवेश केल्यानंतर नाथाभाऊ तर मूळ भाजपचेच असल्याने त्यांनी घर वापसी केली पाहिजे. भाजपा वरिष्ठ पातळीवर तशा हालचाली सुरू असल्याचे सासऱ्यांच्या घरवासी बाबत त्यांनी आपले मौन सोडले आहे. खासदार रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असल्याने तसेच नाथाभाऊ हे त्यांचे सासरे असल्याने त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी नाथाभाऊ खडसे यांचे राजकारणीतील विशेषतः जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाथाभाऊ भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची संपर्क साधत असल्याचे सुतोवाच केले होते. परंतु त्यानंतर काही दिवसांनी मी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विशेषता शरद पवार यांचे नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही, असा स्पष्ट खुलासा केल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर पडदा पडला होता. परंतु आता भाजप मध्ये होणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांच्या प्रवेशानंतर नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली असून त्यातच खासदार रक्षा खडसेंच्या विधानामुळे त्या चर्चेला जिल्हाभरात उधाण आले आहे. खासदार रक्षा खडसे या विधानानंतर अद्याप नाथाभाऊंची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे एकनाथराव खडसे यांची भाजपात घरवापसी झाली तर त्यात आश्चर्यचकित होण्यासारखे काहीच नाही. फक्त भाजपातील एका गटाला त्यांची घर वापसी नको आहे. कारण नाथाभाऊ भाजपात आले तर जिल्ह्यात तसेच राज्यात ते पुन्हा वरचढ होतील ही भीती असल्याने त्यांच्या घरवापसीला विरोध होऊ शकतो. कारण नाथाभाऊ हे अभ्यासू आणि संघटना कौशल्य असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपासाठी असा नेता हवाच आहे. त्यामुळे नाथाभाऊंची घर वापसी झाली तर त्यांचे कोणालाही नवल वाटणार नाही. खासदार रक्षा खडसेंनी मौन सोडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून नाथाभाऊंची घरवापसी करण्यात यश मिळविले तर खासदार रक्षा खडसेंचे वर्चस्व सर्वत्र स्वागतच होईल.

 

एकनाथराव खडसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन विधान परिषदेची आमदारकी बहाल केली. नाथाभाऊंची कन्या सौ. रोहिणी खडसे खेवलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली. भाजपा पक्षांतर्गत राजकारणामुळे नाथाभाऊंच्या होणाऱ्या हेडसांमुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यांनी आपली कन्या तसेच कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर ते नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. परंतु त्यांच्या मागे विविध चौकशीच्या ससेमिरा विद्यमान महायुतीच्या सरकारकडून लावण्यात आला असल्याने त्यांना हैराण करून सोडले आहे. पुणे येथील जमीन घोटाळ्यापासून ते विविध चौकशीला तोंड देऊन त्यातून सुटकेचा निःश्वास टाकताहेत. तोच १३७ कोटी रुपयांच्या गौण खनिज प्रकरणी दंड भरपाईची नोटीस बनवून त्यांची चौकशी सुरू करून तो दंड तातडीने भरण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. १३७ कोटीचे गौण खनिज दंडामध्ये संपूर्ण खडसे कुटुंबाचा समावेश असल्याने आगामी काळात खासदार रक्षा खडसेंपासून सर्वांना त्रास होणार आहे. या १३७ कोटी रुपये दंडाला जरी नाथाभाऊंनी आव्हान दिले असले तरी त्याचा त्रास सर्वांना होणार आहे. यातून सुटका करून घ्यायची असेल तर भाजपात त्यांची घरवापसी झाली तर त्यांना दिलासा मिळू शकतो. म्हणून हे भाजपात पुन्हा येतील ही शक्यता नाकारता येत नाही. अनेक दिग्गजांनी भाजप प्रवेश केला आहे आणि भाजपात प्रवेश करणाऱ्यांची रीग लागलेली आहे. त्यामुळे नाथाभाऊंच्या घरवापसी बद्दल भाजपचे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत असतील तर नाथाभाऊंची घर वापसी होऊ शकते. कारण ते मूळचे भाजपचेच आहेत. जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊ खडसे यांच्या मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. या समर्थक कर्मचाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आगामी निवडणुकीत भाजपाला फायदाच होणार आहे. विशेषतः रक्षा खडसे यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात अनिश्चिततेचे काळे ढग पसरल्याचे दाखविण्यात येत आहेत. त्यातून त्यांचा मार्गही मोकळा होणार आहे, एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.