गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे यांची नावे जाहीर झाली. जळगाव जिल्ह्यातील विद्यमान दोन्ही खासदारांचे तिकीट रद्द होणार, अशी जोरदार चर्चा होती. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेले. तथापि रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवली. परंतु रक्षा खडसेचीही उमेदवारी कापली जाईल, असे खुद्द भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे जळगाव रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा काही प्रमाणात भ्रमनिराश झाल्यामुळे विशेष रावेर लोकसभा मतदारसंघातील बऱ्याच पदाधिकाऱ्यां रोष व्यक्त करून आपल्या पदाचे राजीनामे वरिष्ठांकडे दिले. २०१९ च्या निवडणुकीत स्मिता वाघ यांची जाहीर झालेली. उमेदवारी ऐनवेळी रद्द करून उन्मेष पाटील यांना दिली गेली होती. तशाच प्रकारे भाजपच्या अमोल जावळे यांचे समर्थक कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु त्यांनी आपल्या भावना राजीनामा देऊन व्यक्त केल्या होत्या. परंतु भाजप कार्यकर्त्यांचे हे बंड थंड होणार असे स्पष्ट दिसत होते. आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी राजीनामे देऊन रोष व्यक्त केला असला तरी भाजप विषयी त्यांच्या मनातील प्रेम कायम होते. ग्रामविकास मंत्री तथा भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन ‘हे चहाच्या पेल्यातील वादळ’ असून त्या बाबत कार्यकर्त्यांना आवाहन करताच ते शमणार आहे, याचा त्यांना पूर्ण विश्वास होता. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील भाजप कार्यकारणीच्या आढावा बैठकीत आली. गिरीश महाजन यांनी आवाहन करताच सगळ्यांनी राजीनामे मागे घेतले. तसेच जळगाव आणि रावेर लोकसभेच्या दोन्ही जागा २०१९ च्या निवडणुकीत मधील मताधिक्यापेक्षा जादा मताधिक्याने निवडून येतील, असे जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजराने साद दिली. तसेच मनातील सर्व किरकोळ मतभेद विसरून एक दिलाने निवडणूक कामाला लागण्याच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. हे होणारच होते. कारण आपल्या समर्थक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु एकदा निर्णय झाला की, ते मतभेद विसरून कार्यकर्ते कामाला लागतात. हा आजवरचा भाजपमधील अनुभव आहे..

 

काल मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीला जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तिन्ही जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे या दोन्ही उपस्थित होत्या. जळगाव मतदार संघात ज्यांचे तिकीट कापले गेले ते खासदार उन्मेष पाटील अनुपस्थित होते. अर्थात त्यांची अनुपस्थिती खटकणारी होती. परंतु मेळाव्याचे निमंत्रण ऐवळी मिळाल्याने येऊ शकलो नाही, असा खुलासा खासदार उन्मेष पाटलांनी केला असला तरी एक दिवस आधीच मेळाव्याचे निमंत्रण दिले गेले होते. असा खुलासा भाजप महानगराध्यक्ष उज्वला भेंडाळे यांनी केल्याने खासदार उन्मेष पाटलांचे म्हणणे किती खरे किती खोटे हे त्यांनाच माहित. परंतु उन्मेष पाटल या आढावा बैठकीला उपस्थित राहिले असते तर त्यांचा पक्षाप्रतिचा मनाचा मोठेपणा दिसून आला असता. भाजपचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे एक रावेर लोकसभेसाठी प्रबळ इच्छुक दावेदार होते. त्यांना तिकीट मिळाले नसतानाही ते या आढावा बैठकीला उपस्थित होते. पक्ष संघटनेच्या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या उपस्थितीने पक्षातील प्रेम दिसून आले. खासदार उन्मेष पाटलांच्या मनात नाराजी असणे साहजिक आहे. परंतु राजकीय पक्षात श्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करून शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. आपली उमेदवारी का कापली गेली, याचे आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. खासदार उन्मेष पाटलांचे तिकीट जरी कापले गेले तरी ज्यांना उमेदवारी पक्षाने दिली त्यासाठी मनापासून निवडणुकीत प्रचार करेन, तसेच पक्षाने जी कोणती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल, असे वक्तव्य यापूर्वी त्यांनी केले होते. तथापि कालच्या आढावा मेळाव्याला उपस्थित न राहून किंतु परंतु चा जो वाद झाला तो टाळला पाहिजे होता. असो २०१९ मध्ये देशातील पहिले दहा खासदार मताधिक्याने निवडून आले त्यात खासदार उन्मेष पाटील आता त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, तर भविष्यात उज्वल आहे हे विसरू नये…!

Leave A Reply

Your email address will not be published.