राज्यातील मृत्युंजय दूतांनी वाचविले २ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण – डॉ. रवींद्र कुमार सिंघल

0

 

अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याचे आवाहन

जळगाव ;– राज्यात रस्त्यांवर अपघात झालेल्या २ हजाराहून नागरिकांचे प्राण मृत्युंजय दुतानी वाचविले असून राज्यात पुणे,अहमदनगर,सोलापूर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अपघातांचे मोठे प्रमाण असून महामार्गांवर होणाऱ्या अपघातांबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली .

डॉ. रवींद्रकुमार सिंघल म्हणाले कि, राज्यात २०२१ मध्ये मृत्युंजय दूत यांचे संघटन तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. आज राज्यभरात ३६०० मृत्युंजय दूत असून त्यांना अपघाताबाबत योग्य ते मार्गदर्शन महामार्ग पोलीस विभागातर्फे करण्यात येते . यासाठी त्यांना प्रथमोपचार पेटीचे वाटपही करण्यात येते . त्यांना रस्ते सुरक्षा बाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविली जात असून ५ लाख,३ लाख,२ लाख, १ लाख अशी बक्षिसे देण्यात येणार आहे.

महामार्ग पोलिसांतर्फे २०२२ जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत. २०१६ पासून राज्यात १५ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला आहे.अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याची काळजी घेतल्यास मृत्यू होण्याच्या प्रमाणात काही अंशी घट होऊ शकते. अपघात हे बहुतांशपणे मद्यप्राशन केल्यामुळे होत असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली .

महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधीत पोलीस चौकीचे उद्घाटन

येथील महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधी येथे नवीन महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन तसेच मृत्युंजय‌ दूत गुणगौरव सोहळा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते या महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आलं..

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहीकर, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, उद्योगपती श्रीकांत मणियार , पोलीस उप अधीक्षक प्रदीप मैराळे (नाशिक), पोलीस निरीक्षक हेमंत भामरे (धुळे), प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळहे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.