कोरोनानंतर निमोनियाचे संकट; प्रशासन अलर्ट मोडवर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनासारख्या गंभीर महामारीनंतर चीनमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती पाहता राज्यातील आरोग्य विभागही सतर्क झाले आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चीनसह इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा विचार करत आहे.

 आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक

राज्यातील सर्व जिल्हे आणि महापालिकांना रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा, बेड, ऑक्सिजन आदी सुविधांची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना नुकत्याच देण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या डॉक्टरांसह सर्व राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली.

 

या बैठकीत चीनमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी एक म्हणजे विमानतळांवर रोगनिरीक्षण वाढवणे. यामध्ये ताप तपासण्यापासून ते आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधील असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर विमानतळावरील स्क्रीनिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. कोविडच्या काळात विमानतळावर लागू केलेले प्रोटोकॉल या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. ज्यामध्ये प्रवाशांच्या कायमस्वरूपी पत्त्यावर आरोग्य विभागाकडून चाचणी करण्यापासून ते नियमित निरीक्षणापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो.

आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सरणीकर म्हणाले की, आरोग्य विभागाने मंगळवारीच राज्यातील खासगी रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ते पुढे म्हणाले की, रुग्णालयांना त्यांच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यास आणि कोणत्याही असामान्य प्रकरणांबद्दल त्यांना सतर्क करण्यास सांगितले आहे. याशिवाय कोविड काळात सरकारी रुग्णालयांमध्ये स्थापन झालेल्या सर्व सुविधा आधीच तयार आहेत. इन्फ्ल्यूएन्झासारख्या प्रकरणांमध्ये श्वसन रोगांचे निरीक्षण आणखी वाढवले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.