राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान; सुप्रीम कोर्टात शिवसेनेची याचिका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात आणखी याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.

राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयाच्याविरोधात सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या कारवाईला एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टात येत्या 11 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याशिवाय, शिंदे गटाने शिवसेनेने विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीलाही आव्हान दिले आहे. यासह इतर याचिकांवरही सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार कोसळले. मात्र, त्यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर तीन दिवसांनी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकदेखील पार पडली.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. विधानसभेत झालेली विश्वासमत ठराव प्रक्रियादेखील चुकीची असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. सुभाष देसाई यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.