घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेले ४ नगरसेवक अपात्र

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील घोट्याळ्यात शिक्षा झालेले नगरसेवक कैलास नारायण सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, लता रणजित भोईटे व भगत बालाणी या चार जणांना न्यायालयाने गुरुवारी अपात्र ठरविले.दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही.

दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.पी.सैय्यद यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

शहरातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात या पाचही नगरसेवकांना पाच वर्षाची शिक्षा झालेली आहे. कायद्यानुसार दोन वर्ष शिक्षा झालेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. पदावर असेल तर त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असताना या नगरसेवकांनी निवडणूक लढवली. त्यामुळे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी लॉकडाऊनच्या आधी जळगावच्या दिवाणी न्यायालयात चौघांना अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल केली होती.

ॲड.सुधीर कुळकर्णी यांनी प्रशांत नाईक यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. बालाणी यांनी २९ मार्च रोजी राजीनामा दिलेला असला तरी नगरसेवक व गटनेता पदावर असताना अनेक निर्णय घेतलेले आहेत. महापालिकेत त्यांनी कामकाज केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टाळता येणार नसल्याचा युक्तीवाद ॲड.कुळकर्णी यांनी केला होता, त्यावर न्यायालयाने बालाणी यांचा अर्ज फेटाळून लावला होता.घरकुल घोटाळ्यात झालेल्या शिक्षेमुळे नगरसेवक पद जाण्याची शक्यता पाहता चौघांनी शिक्षेच्या निकालाला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात केला होता. या न्यायालयाने चारही जणांचा अर्ज फेटाळून लावला होता.

न्या. एस.पी.सैय्यद यांनी निकाल देताना या चौघांना शिक्षेचा निकाल लागल्यापासून पुढील सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढता येणार नसल्याचे नमूद केले आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी हा निकाल लागला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.