रोटरी वेस्ट,रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्तदान महाअभियानास सुरुवात

0

जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ मे महाराष्ट्र दिनी रक्तदान महाभियानाची सुरुवात करण्यात आली.

महाअभियानातील पहिले शिबिर सकाळी ८ ते ११ या वेळेत मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित करण्यात आले होते आहे.
जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी या शिबिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी,कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांच्या वतीने निवडणुकीनंतर या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करावा असे रोटरीला आवाहन केले. यावेळी रोटरीचे डीजीएनडी डॉ. राजेश पाटील, अध्यक्ष सरिता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी, प्रकल्प प्रमुख हितेश मंडोरा, रेडक्रॉसच्या उज्वला वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्याच दिवशी सायंकाळी शाहूनगर येथे प्रॅक्टिसिंग व्हॅल्यूअर्स असोसिएशन जळगावच्या सहकार्याने
या महाअभियानातील दुसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेअरमन श्रीहर्ष खाडिलकर, सचिव महेश सोनी यांची उपस्थिती होती.

गुरुवार दि.२ रोजी नवी पेठेतील सराफी व्यावसायिक व रोटरी वेस्टचे घमेंडीराम सोनी यांच्या सहकार्याने तिसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान महाभियानाचे नियोजन रेडक्रॉस व रोटरी वेस्टचे पदाधिकारी गनी मेनन व विनोद बियाणी आणि रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.

तीनही शिबिरांमध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्तींनी रक्तदान करीत सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी रोटरी जळगाव वेस्टच्या सर्व सदस्य व रेडक्रॉस सोसायटीचे डॉक्टर्स, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

उन्हाळ्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी आयोजित या अभियानात ज्या धार्मिक, सामाजिक संस्था, बँका, अपार्टमेंट – कॉलनी, मित्र मंडळ यांना शिबिर आयोजित करावयाचे असेल, त्यांनी रोटरी वेस्टचे महाअभियान प्रमुख हितेश मंडोरा ( 9960944855 ) यांच्या समवेत किंवा इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात उज्वला वर्मा (9422436566) यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.